तालुकास्तरावरील व्हेंटिलेटर धूळखात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST2021-04-04T04:17:26+5:302021-04-04T04:17:26+5:30
परभणी : अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाला दिलेले व्हेंटिलेटर पडून असून, परभणी शहरात मात्र व्हेंटिलेटरची मागणी ...

तालुकास्तरावरील व्हेंटिलेटर धूळखात पडून
परभणी : अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाला दिलेले व्हेंटिलेटर पडून असून, परभणी शहरात मात्र व्हेंटिलेटरची मागणी वाढू लागली आहे.
मागील दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटर असलेल्या रुग्णालयाचा शोध घेत आहेत; परंतु प्रत्यक्षात व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. गतवर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हा प्रशासनाने ७० व्हेंटिलेटरची खरेदी केली होती. त्यापैकी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाला ४ आणि गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाला ४ व्हेंटिलेटर देण्यात आले. उर्वरित ६२ व्हेंटिलेटर परभणी शहरातील आयटीआय हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय सारी वार्ड आणि जिल्हा परिषदेत नव्याने सुरू केलेल्या या रुग्णालयात दिले आहेत. अत्यवस्थ आणि गंभीर रुग्णांची संख्याही जिल्ह्यात अधिक असल्याने व्हेंटिलेटरची मागणी वाढली आहे. शहरात रुग्णांना व्हेंटिलेटर कमी पडत असताना तालुकास्तरावर दिलेले व्हेंटिलेटर मात्र सध्या वापरात नाहीत. मागील वर्षी कोरोना काळात याठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यात आले. यावर्षी मात्र या दोन्ही रुग्णालयांमध्ये अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होत नाहीत. त्यामुळे तेथील व्हेंटिलेटर पडून आहेत.
व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्याची गरज
परभणी शहरात जिल्हा रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्या रुग्णांपैकी काही रुग्णांना ऑक्सिजनची तर काही रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. शहरात वाढत चाललेली रुग्णांची संख्या आणि अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीला व्हेंटिलेटर उपलब्ध होत असले तरी पुढील काळात अधिक व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते. तेव्हा प्रशासनाने यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
गंगाखेडमध्ये १० व्हेंटिलेटर पडून
गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण दहा व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मात्र, या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होत नाहीत. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून १०पैकी एकाही व्हेंटिलेटरचा वापर केला जात नाही. अशीच परिस्थिती सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयातील आहे. या ठिकाणीही उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरचा रुग्ण नसल्याने वापर होत नाही. त्यामुळे यासंदर्भात नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कर्मचाऱ्यांअभावी केंद्र बंद
मागील वर्षी सेलू आणि गंगाखेड या दोन ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जात होते. त्यावेळी कंत्राटी तत्वावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. आता या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने दोन्ही ठिकाणची कोविड हॉस्पिटल बंद आहेत.