अवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कारवाई करण्यापूर्वीच सोडली वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 16:31 IST2019-09-04T16:24:06+5:302019-09-04T16:31:32+5:30
500 ब्रास वाळू उत्खनन करण्यासाठी सोईच्या वाहनांचा वापर

अवैध वाळू वाहतुकीवर दंडात्मक कारवाई करण्यापूर्वीच सोडली वाहने
पाथरी (परभणी ) : तरुगव्हान येथील बंधाऱ्याच्या कामासाठी वाळू उत्खननास दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक साठा असल्याचा अहवाल आणि इटीएस मोजणीतही साठा अधिक आढळून आल्याने पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन झाल्याची बाब स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे 500 ब्रास वाळू उत्खनन करण्यास परवानगी दिल्यानंतर वाळू उत्खनन करताना महसूल यंत्रणेचे कोणतेही नियंत्रण नव्हते , कोणत्या वाहनातून वाळू वाहतूक केली जाणार आहे याची माहिती संबंधित ठेकेदार किंवा लघु पाटबंधारे विभागाचे तहसील कार्यालयाकडे लेखी कळवली नव्हती. त्यामुळे वाळू उत्खनन आणि वाहतूक याबाबत गौडबंगाल अधिक वाढले आहे. तर ठोस कारवाई होण्यापूर्वीच पकडण्यात आलेले 7 ट्रॅक्टर सोडून देण्याची घाई महसूल विभागाने केली आहे. वास्तविक पाहता बंधारा साईटवर 500 ब्रास पेक्षा अधिक किती साठा आहे. याबाबत अद्याप पूर्ण चौकशी झाली नाही. तत्पूर्वीच महसूल विभागाने पकडण्यात आलेले 7 ट्रॅक्टर पोलीस ठाण्यातून तात्पुरत्या स्वरूपात सोडून दिले आहेत.
साडेआठ लाखांचा दंड आकारणी
वाळू वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या 7 ट्रॅक्टर चालकाकडे कोणत्याही पावत्या नसल्याने या वाहनावर आठ लाख 47 हजार 455 रुपये दंड पाथरी तहसील कार्यालयाने आकारणी करत सदर रक्कम भरण्या बाबत लघु पाटबंधारे विभागाला लेखी पत्र दिले.
वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई
500 ब्रास पेक्षा अधिक साठा आढळल्यास त्याबाबत वाढीव स्वामित्व धनाची रक्कम त्या विभागाकडून वसूल करण्याबाबत कळवण्यात आले आहे. पकडलेल्या वाहनांचे कागदपत्र मागवून घेण्यात आले आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार वाहने तात्पुरत्या स्वरुपात सोडण्यात आले आहेत.
- भाग्यश्री देशमुख ,तहसीलदार, पाथरी