उसतोड मजुराची पालाजवळच गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 16:25 IST2023-01-02T16:25:17+5:302023-01-02T16:25:31+5:30
नांदेड जिल्ह्यातील उसतोड मजुराची गंगाखेडमध्ये आत्महत्या

उसतोड मजुराची पालाजवळच गळफास घेऊन आत्महत्या
गंगाखेड (परभणी ): तालुक्यातील मालेवाडी येथे एका उसतोड मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ( दि.२ ) पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
भीमा राम राठोड ( २६ ) असे मृताचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव तांडा येथील भीमा उसतोड मजूर आहे. टोळीसोबत भीम पत्नीसह मालेवाडी येथे उसतोडीच्या कामाला आला होता. दरम्यान, मालेवाडी शिवारात उसतोडीचे काम सुरू होते. पहाटे १ वाजेच्या सुमारास उसाच्या फडाजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला भीमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
काही वेळाने पत्नी बाहेर आली असता तिला भीमाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. इतर मजुरांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हारूग्णालयात रवाना केला. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील मुळगाव रोहीपिंपळगाव तांडा येथून नातेवाईक उपजिल्हारूग्णालयात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.