प्रयोगशील शेतीला विपणनाची जोड देऊन दुष्काळावर केली मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:36 IST2019-04-30T19:35:03+5:302019-04-30T19:36:03+5:30
आगामी काळात फुलांच्या नवीन जातीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.

प्रयोगशील शेतीला विपणनाची जोड देऊन दुष्काळावर केली मात
मानवत : तालुक्यातील शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ, कमी बाजारभाव, तोट्याची शेती या नकारात्मक परिस्थितीला आधुनिकीकरण व प्रयोगशीलतेची जोड देऊन पूर्णपणे बदलले आहे. शेडनेट व पॉलीहाऊसमध्ये गुलाब शेती करुन उत्तम मार्केटिंग, रेशीम शेती, शेततळी, शेतीगट यातून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करुन उत्पन्न वाढीसाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.
तालुक्यातील मंगरुळ हे पाथरी- पोखर्णी रस्त्यावरील साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय. पारंपरिक पिकांमुळे शेती व्यवसाय तोट्यात येत असल्याने गावातील तरुण रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होऊ लागले. २०१६ पासून शेतकऱ्यांनी आधुनिकीकरणाची व प्रयोगशीलतेची कास धरत गाव शिवाराचे चित्रच बदलून टाकले आहे. पारंपारिक पिकांऐवजी गुलाब शेतीला सुरुवात केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येत जय मल्हार शेतकरी गटाची नोंदणी केली. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान मिळविले. २०१६-१७ साली १० शेतकऱ्यांनी प्रत्येकी २० गुंठे या प्रमाणे शेडनेट उभारुन डच गुलाबांची लागवड केली होती. सध्या वर्षभर डच फुलांचे उत्पादन शेतकरी घेतात. शेतकऱ्यांनी स्वत: पॅकिंगचे कौशल्य विकसित करीत आपली नागपूर, पुणे, नांदेड आदी ठिकाणी फुले पाठवून योग्य दर प्राप्त केला आहे.
शेडनेट शेतीचे अर्थकारण पटल्यानंतर १० पॉलीहाऊस शेतशिवारात उभी राहिली. त्याच बरोबर ३० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यास सुरुवात केली.
बंगरुळ येथे रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. शेतात १५ हून अधिक शेततळे निर्माण करण्यात आले आहेत. यामुळे शाश्वत सिंचनाची सोय झाली आहे. शिवाय शेततळ्यात मत्स्य बीज सोडून उत्पन्न घेतले जाते. मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्स्फसरिंगद्वारे मंगरुळ येथील मोहन कापसे यांच्याशी चर्चा करुन प्रकल्पाचीे माहिती दिली. या सर्व कार्यात कृषी विभागाने मोलाचे सहकार्य केले आहे. नुकतेच प्रजासत्ताकदिनी कृषी सहाय्यक भास्कर शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मंगरुळ या गावाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली प्रगती अन्य गावांना पथदर्शक ठरावी, अशीच आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
मानवत तालुक्यातील मंगरुळ येथे सध्या पॉलीहाऊसमध्ये ९ शेतकरी डच गुलाबाचे उत्पादन घेतात. शेडनेटच्या माध्यमातून १० शेतकरीही गुलाबाचेच उत्पादन घेतात. तर ३० शेतकरी रेशीम उत्पादक आहेत. १५ शेतकरी हे शेततळ्यात मत्स्यबीज सोडून मत्स्य व्यवसाय करतात. आगामी काळात फुलांच्या नवीन जातीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.