परभणीसह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस
By राजन मगरुळकर | Updated: March 16, 2023 16:33 IST2023-03-16T16:32:21+5:302023-03-16T16:33:23+5:30
या पावसाने ज्वारी पिकाचे नुकसान तर काही ठिकाणी मोसंबी, गहू आडवा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

परभणीसह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस
परभणी : शहर परिसरात गुरुवारी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान काही वेळ अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटात रिमझिम पाऊस झाला. यासह जिल्ह्यातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली.
प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार १४ ते १७ मार्चच्या दरम्यान जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परभणी शहर परिसरात बुधवारी दिवसभरात वातावरणामध्ये अनेकदा बदल झाला. काही वेळ ढगाळ वातावरण तर काही वेळ ऊन अशी स्थिती दिसून आली. गुरुवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान परभणी शहर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच गुरुवारी दुपारी काही वेळ पावसाचा शिडकावा झाला. यासह मानवत तालुक्यातील रामपुरी, हटकरवाडी, थार वांगी, साखरेवाडी, सारंगापूर परिसरात पावसाने हजेरी लावली. सेलू तालुक्यातील हिस्सी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गंगाखेड तालुक्यातील खंडाळी परिसरात वाऱ्यासह पाऊस झाला. सेलू तालुक्यातील कुपटा येथे गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास काही वेळ पाऊस झाला.
मोसंबीची झाडे वाऱ्यामुळे उन्मळून पडली
सेलू तालुक्यातील गूळखंड शिवारात अफजल शेख यांच्या शेतातील मोसंबी पिकाची झाडे वाऱ्यामुळे उन्मळून पडली. या पावसाने ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मोसंबी, गहू आडवा झाला.