वाहक- चालकाच्या आले मना, ८ तासांच्या प्रवासासाठी बसने घेतले तब्बल २५ तास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 20:12 IST2024-12-02T20:12:34+5:302024-12-02T20:12:57+5:30
संबंधित वारकरी आता एसटी प्रशासनाविरोधात न्यायालयात दाद मागण्याच्या मनस्थितीत आहेत.

वाहक- चालकाच्या आले मना, ८ तासांच्या प्रवासासाठी बसने घेतले तब्बल २५ तास
गंगाखेड : एसटी बसच्या वाहक-चालकाच्या मनमानी कारभाराचा वारकऱ्यांना मनस्ताप होऊन ८ तासांच्या प्रवासासाठी २५ तास घालवावे लागल्याने वारकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. संबंधित वारकरी आता एसटी प्रशासनाविरोधात न्यायालयात दाद मागण्याच्या मनस्थितीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील झोला गावातील सुमारे ५५ प्रवासी आळंदी (देवाची) येथे उत्पत्ती एकादशीनिमित्त दर्शनासाठी गेले होते. आळंदी यात्रा आटोपून २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता बस (क्रमांक एमएच २० बीएल २३८२) ने हे सर्व वारकरी झोला गावाकडे निघाले. ८ तासांच्या प्रवासासाठी संबंधित एसटी बसच्या वाहक- चालक यांच्या मनमानी कारभारामुळे तब्बल २५ तासांच्या वेळेनंतर गावात पोहोचावे लागले. यादरम्यान एसटी बसमधील महिला, वृद्ध यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला न्याय मागण्यासाठी आपण न्याययालयात दाद मागणार असल्याचे या एसटीतील प्रवासी लक्ष्मणराव मुरकुटे झोलकर यांनी सांगितले.