बसवर दगडफेक करून वाहक-चालकास दोघा मद्यपीने केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 13:15 IST2024-11-07T13:15:23+5:302024-11-07T13:15:36+5:30
बस पोलीस ठाण्यात आणल्याने प्रवाशी ताटकळत बसले होते.

बसवर दगडफेक करून वाहक-चालकास दोघा मद्यपीने केली मारहाण
गंगाखेड: परभणी ते कोल्हापूर जाणारी बस परळी मार्गावरील न्यु मार्केट यार्ड कमान परिसरात अडवून समोरील काचावर दगडफेक करून दोघा मद्यपीने वाहक आणि चालकास मारहाण केली. सदरची बस चालकाने पोलीस स्टेशन जवळ उभी करून पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. मात्र, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. ही घटना बुधवार रोजी रात्री ८ वाजता घडली. बस पोलीस ठाण्यात आणल्याने प्रवाशी ताटकळत बसले होते.
परभणी आगराची बस गंगाखेड मार्ग परळी ( जि.बिड ) येथून कोल्हापूरकडे जात होती. परभणीहून गंगाखेड बसस्थानकात थांबा घेऊन बस परळी मार्गाने जात होती. दरम्यान, परभणी ते कोल्हापूर बस ( क्रमांक एम.एच २० जी.सी.३४८० ) गंगाखेडपासून ३ किलोमीटर अंतरावरील न्यु मार्केट यार्ड कमानीजवळ परळी मार्गावर ऑटोतून आलेल्या दोन मद्यपीने बस अडवली. बस थांबताच चालकासमोरील बसच्या काचावर दगडफेक करून काच फोडली. त्यानंतर वाहक आणि चालकास मारहाण केली. रस्त्यावर बस अडवून मारहाण झाल्याने बस मधिल प्रवाशी घाबरून गेले. या बसमध्ये ७० प्रवाशी होते. मारहाणीची व दगडफेक झाल्याची घटना घडताच चालकाने बस परळी मार्गावरून परत गंगाखेड पोलीस स्टेशनला आणली. यावेळी पोलीस ठाण्यात गंगाखेड बस आगराचे कर्मचारी आले होते.पोलीस ठाण्यात वाहक आणी चालकानी घडलेली घटना सागितली.यावेळी प्रवाशाना ताटकळत थांबावे लागले.रात्री उशिरापर्यंत या घटनेचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झालेला नव्हता.