परभणी जिल्ह्यात ट्रकला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 16:44 IST2018-04-09T00:36:31+5:302018-04-09T16:44:21+5:30
शॉर्ट सर्किटमुळे गॅसच्या ट्रकला आग लागून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ७ एप्रिल रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर पाटीजवळ घडली.

परभणी जिल्ह्यात ट्रकला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा: शॉर्ट सर्किटमुळे गॅसच्या ट्रकला आग लागून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ७ एप्रिल रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर पाटीजवळ घडली.
औरंगाबादहून धर्माबादकडे जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.२६- एडी २०१४) गॅसच्या टाक्यांनी भरलेला होता. अचानक शॉर्ट सर्किट होऊन ट्रकच्या इंजिनला आग लागली.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरर्डीकर, चारठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर घोळवे, प्रल्हान भानुसे, इरफान इनामदार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये ट्रकचे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली.ट्रकचालक मोहम्मद मौलासहाब शेख यांनी चारठाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास बीट जमादार इरफान इनामदार हे करीत आहेत.
अनर्थ टळला
या ट्रकमध्ये गॅस भरलेल्या एकूण ३०६ टाक्या होत्या. आग लागल्यानंतर चारठाणा पोलिसांनी तात्काळ उपाययोजना केली. अग्निशमन दलाला पाचारण करुन वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.