मानवत येथे आडत व्यापाऱ्याची पाच लाखाची रोकड पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 19:58 IST2019-04-05T19:55:43+5:302019-04-05T19:58:00+5:30
चोरट्यांचा पाठलाग केला असता ते पाथरीकडे भरधाव वेगाने निघून गेले.

मानवत येथे आडत व्यापाऱ्याची पाच लाखाची रोकड पळवली
मानवत (परभणी ) : आडत व्यापाऱ्याची बॅंकेतुन काढलेली पाच लाखाची रक्कम दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यानी पळवल्याची घटना आज (दि.५) दुपारी दोन वाजता मोंढा परिसरात घडली. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीने एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील मोंढा परिसरात वामनराव कोक्कर यांची आडत दुकान आहे. व्यवहारासाठी रक्कम आवश्यक असल्याने दुकानातील कामगारांना त्यांनी बँकेत पाठवले. भरत पारखे, रमेश कदम हे बाजार समितीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले. दोघेही बँकेतून पाच लाखाची रक्कम एका पिशवीत घेऊन दुचाकीवरून दुकानाकडे निघाले. याचवेळी बाजार समितीच्या गेटजवळ पाठी मागील बाजूने दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी हिसका मारुन रोख रक्कमेची पिशवी पळवली. दोघांनीही चोरट्यांचा पाठलाग केला असता ते पाथरीकडे भरधाव वेगाने निघून गेले. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.