बाजारपेठेत तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:14 IST2021-04-03T04:14:30+5:302021-04-03T04:14:30+5:30
परभणी : जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीमुळे मागील ९ दिवसांपासून ठप्प असलेल्या येथील बाजारपेठेत शुक्रवारी प्रथमच आर्थिक व्यवहार झाले. ...

बाजारपेठेत तोबा गर्दी
परभणी : जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीमुळे मागील ९ दिवसांपासून ठप्प असलेल्या येथील बाजारपेठेत शुक्रवारी प्रथमच आर्थिक व्यवहार झाले. किराणा साहित्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याने बाजारपेठ गजबजून गेली होती.
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. फिजिकल डिस्टन्स आणि मास्कचा वापर बंधनकारक केल्यानंतरही जिल्ह्यातील गर्दी कमी होत नसल्याने संसर्ग वसाहतींमधून ग्रामीण भागात पसरत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्चपासून ते १ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. या सात दिवसांच्या काळात जिल्हाभरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर दुसरीकडे किराणा साहित्य, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांची धांदल उडाली.
७ दिवसांपासून व्यवहार बंद असल्याने संचारबंदी रद्द करावी, या मागणीने जोर धरला. व्यापारी, विविध पक्ष संघटना आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने २ एप्रिलपासून संचारबंदीत सूट देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्यात आली. ९ दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प असल्याने नागरिकांनीही खरेदीसाठी मोठी गर्दी केली. सकाळी १० वाजेपूर्वीच बाजारपेठ भागात गर्दी पाहावयास मिळाली. सकाळचा भाजीपाला खरेदीपासून सुरू झालेली ही गर्दी दुपारी २ वाजेपर्यंत कायम होती. कच्छी बाजार, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ या भागामध्ये ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी दाखल झाले. त्यामुळे अनेक दिवसानंतर बाजारपेठ फुल्ल झाल्याचे पाहावयास मिळाले.
वाहतुकीवर ताण
अनेक दिवसानंतर मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले. संचारबंदीमुळे आतापर्यंत ओस असलेल्या रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ दिसून आली. एकाच वेळी वाहनांची संख्या वाढल्याने बाजारपेठ भागातील वाहतूक व्यवस्थेवर ताण आला. दिवसभरात अनेकवेळा वाहतूक ठप्प झाली होती. येथील नवा मोंढा भागात किराणा मालाच्या ठोक विक्रेत्यांची दुकाने आहेत. या भागातही खरेदीसाठी झुंबड उडाल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले. परभणी शहरासह जिल्हाभरात बाजारपेठेतील व्यवहार काही काळासाठी शिथिल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
पोलिसांची गस्त
दुपारी २ वाजेनंतर दुकाने सुरू ठेवण्यास निर्बंध असल्याने पोलीस प्रशासनाने दुपारी २ नंतर मुख्य बाजारपेठेमध्ये गस्त घालून दुकाने बंद करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. तसेच रस्त्यावरील गर्दीही हटविली. शुक्रवारी शहरातील शिवाजी चौक, नानलपेठ कॉर्नर, अष्टभुजा देवी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर या भागात पोलिसांचा बंदोबस्त लावला होता.