पुढील चार दिवसांत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना; काही भागांत गारपिटीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 14:25 IST2023-04-27T14:25:22+5:302023-04-27T14:25:46+5:30
परभणीच्या ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचा अंदाज

पुढील चार दिवसांत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना; काही भागांत गारपिटीची शक्यता
हिंगोली : प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, पुढील चार दिवसांत वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होईल. दरम्यान, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.
२७ एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर व धाराशिव, २८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड लातूर व धाराशिव, २९ एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर व धाराशिव जिल्ह्यात, तर ३० एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळीवारा, मेघगर्जना होईल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.
दोन दिवस गारांचा पाऊस...
२७ एप्रिल रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत, तर २८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे, असा अंदाज परभणीच्या ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने वर्तविला आहे.