थरारक ! पुरात वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचे युवकांनी वाचवले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 21:20 IST2021-07-23T21:19:35+5:302021-07-23T21:20:20+5:30
Rain In Parabhani : पुराचे पाणी कमी असल्याचा समज झाल्याने शेतकरी पाण्यात उतरले पण

थरारक ! पुरात वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचे युवकांनी वाचवले प्राण
देवगाव फाटा (जि. परभणी) सेलू तालुक्यातील करपरा नदीला आलेल्या पुरात वाहून जाणाऱ्या एका शेतकऱ्याचा चार युवकांनी प्राण वाचविल्याची घटना गुरुवारी घडली.
परभणी जिल्ह्यात गुरुवारी अतिवृष्टी झाली. सेलू तालुक्यातही अतिवृष्टीने नदी, नाल्यांना पूर आला होता. तालुक्यातील बोरकिनी व नरसापूर येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व येण्यासाठी करपरा नदी पार करावी लागते. या नदीवर पूल नसल्याने कच्च्या रस्त्यानेच ग्रामस्थ ये- जा करतात. बोरकिनी येथील शेतकरी अर्जुन मुसळे हे गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नरसापूर येथील शेतातून घरी बोरकिनी येथे परतत असताना करपरा नदीला पूर आला होता.
पुराचे पाणी कमी असल्याचा समज झाल्याने ते पाण्यात उतरले व गावाकडे जात असताना पुराच्या पाण्याचा प्रवाह अधिक वेगवान असल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागले. यावेळी नदीकाठावरील ग्रामस्थांनी आरडाओरडा केला. त्यानंतर येथील तरुण अमर गडदे, पंजाब ढाले, रामेश्वर मुसळे, संतोष ढाले यांनी दोरखंडाच्या साहाय्याने अर्जुन मुसळे यांना नदीपात्रातून बाहेर काढले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याबद्दल या युवकांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. दरम्यान, नरसापूर ग्रामस्थांचा दोन दिवसांपासून पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटला आहे.