उन्हाळी हंगामासाठी तीन पाणी पाळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:16 IST2021-04-05T04:16:06+5:302021-04-05T04:16:06+5:30
परभणी : माजलगाव कालवा कार्यक्षेत्रातील निम्न प्रकल्पामधून उन्हाळी पिकांसाठी तीन पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये १८ ते ...

उन्हाळी हंगामासाठी तीन पाणी पाळ्या
परभणी : माजलगाव कालवा कार्यक्षेत्रातील निम्न प्रकल्पामधून उन्हाळी पिकांसाठी तीन पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये १८ ते ३१ मार्चदरम्यान पहिली पाणी पाळी सोडण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना या पाण्याचा सिंचनासाठी मोठा फायदा झाला आहे.
निम्न दुधना प्रकल्पांमध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला गेला. या पाण्याचा शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी फायदा व्हावा, या हेतूने कालवा सल्लागार बैठकीमध्ये रबी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार रबी हंगामात तीन पाणी पाळ्या निम्न दुधना प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्यावरील लाभधारकांना देण्यात आल्या. यामध्ये रबी हंगामातील जवळपास ३ हजार हेक्टरवरील सिंचन या पाण्यामुळे झाले, तसेच आता उन्हाळी हंगामातील भुईमूग, भाजीपाला, चारावर्गीय पिके, ऊस या पिकांना पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी दुधना प्रकल्पातून प्रत्यक्ष सिंचनासाठी तीन पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. १८ ते ३१ मार्चदरम्यान पहिली पाणी पाळी देण्यात आली आहे. या पाणी पाळीदरम्यान डाव्या व उजव्या कालव्यावरील शेतकऱ्यांनी पाणी घेऊन चाऱ्यासह उन्हाळी हंगामातील पिकांना सिंचन दिले ाआहे. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता १५ ते २९ एप्रिल या काळात दुसरी, तर १३ ते २७ मे या कालावधीत तिसरी पाणी पाळी निम्न दुधना प्रकल्पातून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळी हंगामातील चांगले उत्पन्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निम्न दुधना प्रकल्पात यावर्षी १०० टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे परभणी व जालना जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी तीन पाणी पाळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी य पाण्याचा उन्हाळी हंगामातील पिकांसाठी लाभ घ्यावा.
प्रसाद लांब, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग.