साडेतीन लाख रुपयांचा खर्च, शंभर रुपयांच्या बॉण्डवर लग्नाचा करार; नंतर मुलगी गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:50 IST2025-07-05T18:49:58+5:302025-07-05T18:50:37+5:30
तरुणाच्या फसवणूकप्रकरणी ८ ठगांविरोधात गुन्हा दाखल

साडेतीन लाख रुपयांचा खर्च, शंभर रुपयांच्या बॉण्डवर लग्नाचा करार; नंतर मुलगी गायब
गंगाखेड (जि. परभणी) : तालुक्यातील धारखेड येथील ३१ वर्षीय तरुणास लग्न लावून देतो, म्हणून विश्वासात घेत त्याची ३ लाख ६६ हजार ९६० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ८ जणांविरोधात शुक्रवारी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गंगाखेड तालुक्यातील धारखेड येथील रामभाऊ चिंतामणी भालके या तरुणाने फिर्याद दिली. यामध्ये फिर्यादी तरुणाच्या समाजात मुली मिळत नसल्याचा फायदा घेऊन आरोपींनी तरुणाला मुलगी दाखवून तिच्यासोबत लग्न लावून देतो, असा बनाव केला. लग्न लावण्यासाठी ३ लाख रुपयांचे दागिने तसेच कपडे व इतर साहित्य खरेदी केले. शंभर रुपयांच्या बॉण्डवर एकमेकांशी संमतीने लग्न करत असल्याबाबत लेखी करार केला. आरोपींनी आम्ही सोबत येऊ शकत नाहीत, तुम्ही मुलीस गावाकडे घेऊन जा, असे सांगितले. फिर्यादीने मुलीस गावाकडे आणून लग्न केले.
परंतु, पुन्हा एका अज्ञात मोबाइल नंबरवरून मुलीस जळगावला घेऊन या, असे सांगितले व नंतर फिर्यादीसोबत मुलीस पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. युवकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ३ जुलैला गंगाखेड पोलिस ठाण्यात संबंधित युवकाने तक्रार दिली. या फिर्यादीत भगवान सखाराम बचाटे, शेषराव चिंतलवाड, शिवाजी वागडकर, मनीषा भैया पाटील, मीनाक्षी दिनेश जैन, मीना प्रकाश बोरसे, सुजाता ठाकूर, अक्षा गंगाधर जोशी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. तपास कामासाठी संबंधित प्रकरण जळगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती गंगाखेड पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.