परभणीत चोरट्यांचे धाडस; शासनाचे सॉफ्टवेअर पळविले, प्रशासनीक गोपनीयतेच्या दृष्टीने चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:57 IST2025-11-04T19:57:07+5:302025-11-04T19:57:30+5:30
अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील घटना; साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास

परभणीत चोरट्यांचे धाडस; शासनाचे सॉफ्टवेअर पळविले, प्रशासनीक गोपनीयतेच्या दृष्टीने चिंता
परभणी : शहरातील रामकृष्णनगरमधील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात चोरट्यांनी धाडसी चोरी करत राज्य शासनाचे महत्त्वाचे सॉफ्टवेअर नियंत्रित विस्तृत क्षेत्र नेटवर्क प्रकल्पअंतर्गत बसविण्यात आलेले फोर्टिनेट फोर्टिगेट एफजी-८१ एफ सुरक्षा यंत्र तसेच सीसीटीव्ही यंत्रणेतील डीव्हीआर आणि एचडीडी असा ४ लाख ७८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
शुक्रवारी सकाळी ९.२० वाजता कार्यालयातील कर्मचारी पंढरी लोंढे यांनी फोनवर वरिष्ठांना चोरीची माहिती दिली. तेव्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयात पोहोचले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले, कपाट उघडे, लॉकर फोडलेले आणि कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली आढळली. या चोरीमुळे कार्यालयीन कामकाजास अडथळा निर्माण झाला असून, शासनाच्या प्रकल्पातील संवेदनशील उपकरण चोरीस गेल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना ३० ऑक्टोबरच्या रात्रीपासून ३१ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत घडली असून, चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सकाळी कार्यालय उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही घटना आली.
या प्रकरणी सहाय्यक आयुक्त अनंतकुमार एकनाथ चौधरी यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, कार्यालयातील राज्य शासनाचे महत्त्वाचे सॉफ्टवेअर नियंत्रित विस्तृत क्षेत्र नेटवर्क प्रकल्प अंतर्गत बसविण्यात आलेले फोर्टिनेट फोर्टिगेट एफजी-८१ एफ सुरक्षा यंत्र तसेच सीसीटीव्ही यंत्रणेतील डीव्हीआर आणि एचडीडी असा ४ लाख ७८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, राज्य शासनाचे सॉफ्टवेअर उपकरण चोरीस गेल्याने सायबर सुरक्षा आणि प्रशासनिक गोपनियतेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे.