'जलजीवन'ला निधी नाही;हलगी वाजवून काम बंदचा कंत्राटदारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:50 IST2025-02-04T17:47:44+5:302025-02-04T17:50:01+5:30
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हामध्ये ६५० नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना २०२१-२२ या एकाच वर्षात आदेश दिले होते.

'जलजीवन'ला निधी नाही;हलगी वाजवून काम बंदचा कंत्राटदारांचा इशारा
हिंगोली : जल जीवन मिशनच्या कामांना निधी उपलब्ध झाला नाही तर १७ फेब्रुवारीपासून काम बंद केले जाईल, असा इशरा जिल्हाभरात जल जीवन मिशनचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी प्रशासनाला दिला आहे.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हामध्ये ६५० नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना २०२१-२२ या एकाच वर्षात आदेश दिले होते. जिल्ह्यात कंत्राटदारांची संख्या अपुरी असल्याने एका कंत्राटदारास अनेक योजनांची कामे विभागा मार्फत वाटून देण्यात आली. शिवाय मजूर, मिस्त्री यांची संख्याही कमी असल्याने कामे वेळेत होऊ शकली नाहीत. याबाबत माहीत असतानाही प्रशासनाने कामे वेळेत करावीत म्हणून कंत्राटदारांना नोटीस बजावल्या. कंत्रांतदारांनीही अनेक गावांमध्ये योजनेचे कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र आठ महिन्यांपासून देयक अदा करण्यासाठी विभागाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे कंत्राटदारांची उपासमार होत आहे. योजनेच्या उद्भव विहिरीला पाणी न लागल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू करता आला नाही. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी सक्षम निर्णय घेतला नाही. तेव्हा जल जीवन मिशनच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा १७ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सुधारित अंदाजपत्रकांची नामुष्की
त्रयस्थ कंपनीने चुकीचा सर्वे करून अंदाजपत्रके बनविली. त्यामुळे ६५० गावांपैकी ३५० पेक्षा अधिक गावांमध्ये सुधारित अंदाजपत्रक तयार करावे लागत आहे. एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरीही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने एकाही सुधारित अंदाजपत्रकास शासनाकडून मंजुरी घेतली नाही. त्याचाही फटका कंत्राटदारांना सहन करावा लागत आहे.
प्रशासनाला दिले निवेदन
मंगळवारी हलगी वाजवत कंत्राटदार जिल्हा परिषदेत दाखल झाले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. यावेळी संतोष घुगे, अविनाश पानपट्टे, संदीप पतंगे, सुरेश शेळके, अनंत गिरी, नामदेव कोरडे, विष्णू जगताप, ज्ञानेश्वर गरड, दीपक जयस्वाल, भागवत भोयर, मनोज माळोदे, गजानन नागरे आदी उपस्थित होते.