...तर सुरेश धसांनी आपले कुटुंब पोलिसांच्या ताब्यात द्यावे ! सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 20:12 IST2025-02-10T20:11:38+5:302025-02-10T20:12:04+5:30
आमदार सुरेश धस यांनी पोलिसांना माफ करा, अशी भूमिका घेतली होती; विजया सूर्यवंशींचा पोलिसांना माफीस विरोध

...तर सुरेश धसांनी आपले कुटुंब पोलिसांच्या ताब्यात द्यावे ! सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा संताप
परभणी : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषी पोलिसांना माफ करा, असे म्हणणारे आमदार सुरेश धस यांनी आपले कुटुंब दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तेव्हा, त्यांना मुलाच्या मृत्यूचे महत्त्व कळेल, अशी संतापजनक भावना विजयाबाई सूर्यवंशी यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
आमदार सुरेश धस यांनी पोलिसांना माफ करा, अशी भूमिका घेतली होती. या भूमिकेवर सोमवारी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी परभणीत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आमदार सुरेश धस मला भेटण्यासाठी रात्री २:३० वाजता आले होते, तेव्हा मुख्यमंत्री विधानसभेत खोटे कसे बोलू शकतात, असे ते म्हणाले. मात्र, सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांना माफ करा, अशी भूमिका धस आता घेत आहेत. मुख्यमंत्री खोटे बोलले म्हणणारे धस दोन महिन्यांतच फिरले आहेत. मात्र, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. आम्ही दगडे फोडणारी माणसे आहोत. आमचे मन लहान आहे. त्यामुळे आम्ही दोषींना माफ करणार नाही. परंतु, पोलिसांना माफ करायचे असेल, तर सुरेश धस यांनी आपले कुटुंब दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात द्यावे, त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना माफ करावे, अशी टीका मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी केली. पत्रकार परिषदेस अविनाश सूर्यवंशी, अविनाश भोसीकर आदींची उपस्थिती होती.