पाऊस, धुक्यामध्ये नाणेघाट ते भीमाशंकर ट्रेकचा थरार; परभणीच्या गिर्यारोहकांची मोहीम फत्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:45 IST2025-07-30T16:36:48+5:302025-07-30T16:45:02+5:30
सह्याद्रीत भर पावसांत तीन दिवसांत नाणेघाट ते भीमाशंकर ७५ किमीचा ट्रेक यशस्वी आढळले ऐतिहासिक शिलालेख

पाऊस, धुक्यामध्ये नाणेघाट ते भीमाशंकर ट्रेकचा थरार; परभणीच्या गिर्यारोहकांची मोहीम फत्ते
परभणी : मुसळधार पावसात धुक्याने आच्छादलेला सह्याद्री, तसेच चढाईस कठीण असलेला नाणेघाट ते भीमाशंकर ट्रेक परभणीच्या स्वराज्य ट्रेकर्सच्या १७ सदस्यांनी केवळ तीन दिवसांत यशस्वीपणे पार केला. या मोहिमेची एकूण दुर्मीळ आणि साहसी ७५ किलोमीटरची मार्गदर्शक प्रवास होता.
या मोहिमेची सुरुवात ठाणे जिल्ह्यातील वाल्लीवरे गावातून शुक्रवारी झाली. सातवाहन काळातील ऐतिहासिक व्यापारी मार्ग असलेल्या नाणेघाटाची चढाई गिर्यारोहकांनी सात तासांत, जोरदार पावसात पार केली. मार्गातील गुहांमध्ये आजही ब्राह्मी लिपीत लिहिलेला प्राकृत भाषेतील शिलालेख दिसतो, तर टोल वसुलीचे प्रतीक असलेला रांजण देखील आहेत. यामुळे गिर्यारोहकांना ऐतिहासिक ठसा अनुभवता आला. त्यानंतर त्यांनी जीवधन किल्ला सर केला. पावसाळ्यात अधिकच कठीण होणाऱ्या नाळेवाटेने चढाई करताना, पाय घसरणारे दगड, झाडाझुडपांमधून जाणारी वाट आणि धारदार पाण्याच्या धारांना तोंड देत गिर्यारोहकांनी साहसाचे उत्तम दर्शन घडवले.
२६ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबोली गावातून ढाकोबा व दुर्ग किल्ल्याच्या दिशेने चढाई सुरू झाली. अनेक धबधबे, घनदाट जंगल आणि चिखलाने भरलेले मार्ग पार करत गिर्यारोहकांनी दुर्गम वाटा सहज पार केल्या. २७ जुलै रोजी आहुपे गावातून सुरू झालेला शेवटचा टप्पा अनेक डोंगररांगा पार करत भीमाशंकर गावी समाप्त झाला. संपूर्ण मोहिमेत गिर्यारोहकांनी निसर्गातील अनेक आव्हानांना तोंड देत, कठीण चढाई व दाट जंगलातील मार्गावर मात करून धाडसी साहस सिद्ध केले.
यांनी नोंदविला सहभाग
ही मोहीम नाशिक येथील जॉकी सोळुंके व किशन मोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, तर नेतृत्व स्वराज्य ट्रेकर्सचे माधव यादव, गुलाब गरूड आणि रणजित कारेगावकर यांनी सांभाळले. मोहिमेत प्रा. डॉ. जयंत बोबडे, डॉ. रमेश शिंदे, ॲड. सोमनाथ व्यवहारे, प्रा. राम कराळे, प्रसाद गरूड, विष्णू मेहत्रे, भागवत मोरे, शंकर गायकवाड, गजानन पवार, गणेश यादव, प्रकाश राठोड, गजानन तुरे, हरिओम पवार, ऋषिकेश मुळे यांचा सहभाग होता.
दुर्गम किल्ल्यांचे दर्शन
स्वराज्य ट्रेकर्स संस्थेमार्फत दरवर्षी अशा साहसी मोहिमांचे आयोजन केले जाते. यामार्फत सह्याद्रीतील दुर्गम किल्ल्यांचे दर्शन घडवले जाते, तसेच गिर्यारोहणाच्या माध्यमातून इतिहासाची ओळख, शारीरिक क्षमतेची चाचणी आणि मनोबल वृद्धी यांचा संगम साधला जातो. अशा मोहिमांमुळे तरुण पिढीत देशाच्या दुर्गवारशाचा अभिमान जागविला जात आहे.