SSC-HSC exam: परीक्षेत विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास पर्यवेक्षक जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 16:01 IST2022-02-18T16:00:20+5:302022-02-18T16:01:36+5:30
SSC-HSC exam: दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाची नियमावली जाहीर

SSC-HSC exam: परीक्षेत विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास पर्यवेक्षक जबाबदार
परभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू करण्यात आली असून, नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एकाच वर्गात एकाचवेळी पाचपेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यासह पर्यवेक्षकाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखीपरीक्षा ४ मार्चपासून, तर दहावीच्या लेखीपरीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहेत. या अनुषंगाने परीक्षेसाठीचे केंद्र, पथकांची स्थापना आदींची तयारी शिक्षण मंडळाने चालविली आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनाही शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एकाच वर्गात एकाचवेळी पाचपेक्षा जास्त विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यासह पर्यवेक्षकाला जबाबदार धरले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश केंद्र संचालकांना देण्यात आले आहे. या केंद्रावर अनावश्यक हस्तापेक्ष करू नये, तणावमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच कोविडच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन सर्व केंद्रप्रमुखांनी करावेत, असेही या मार्गदर्शक सूचनेत मंडळाने नमूद केले आहे.
चार सदस्यांचे एक बैठे पथक
प्रत्येक परीक्षा केंद्रावर किमान चार सदस्यांचे एक बैठे पथक नियुक्त करण्यात यावे, परीक्षा कालावधीत दोन सदस्यांनी वारंवार परीक्षा हॉलमधून फेरी माराव्यात व दोन सदस्यांनी केंद्राच्या आवारात फेरी मारावी. पथकातील सदस्यांची संख्या कमी जास्त असल्यास त्याची पथकप्रमुखांनी विभागणी करावी तसेच पथकातील सदस्यांनी विद्यार्थ्यांना किंवा पर्यवेक्षकांना कोणत्याही परस्पर सूचना देऊ नयेत, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.