देशसेवेची भावना अमर; सेलूचे १४ माजी सैनिक पुन्हा लष्करी सेवेस सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:09 IST2025-05-09T12:05:53+5:302025-05-09T12:09:39+5:30
हे सर्व माजी सैनिक भारतीय लष्कराच्या विविध विभागांमध्ये जबाबदारीने कार्यरत होते.

देशसेवेची भावना अमर; सेलूचे १४ माजी सैनिक पुन्हा लष्करी सेवेस सज्ज
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (परभणी) : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढलेला तणाव हा संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या लष्कराच्या विविध शाखा अत्युच्च सज्जतेसह कार्यरत असून परिस्थितीवर बारीक नजर ठेवली जात आहे. अशा संवेदनशील काळात केवळ विद्यमान सैनिकच नव्हे, तर माजी सैनिकही देशाच्या रक्षणासाठी सज्ज असल्याचे उदाहरण सेलू शहरात दिसून आले आहे.
येथील १४ माजी सैनिकांनी पुन्हा एकदा देशसेवेची तयारी दर्शवत "आम्हाला सरकार किंवा लष्कराकडून पुन्हा बोलावले गेले, तर आम्ही वर्दी परिधान करून तत्काळ हजर होऊ," असे ठाम उद्गार माजी ऑर्डिनरी लेफ्टनंट रमेश काकडे यांनी व्यक्त केले. त्यांच्या बरोबर माजी कॅप्टन जे. पी. शर्मा, सुभेदार सुरेश रोडगे, सुभेदार सूर्यभान पवार, प्रकाश देऊळगावकर, विठ्ठलसिंह रघुवंशी, विठ्ठल शिंदे, पुरण पुरभे, संतोष शेळके, एस.के. महाजन, भगीरथ गायकवाड, भगवान भराटे, सदाशिव पौळ आणि पद्माकर कुलकर्णी यांनीही ही सज्जता दाखवली आहे.
हे सर्व माजी सैनिक भारतीय लष्कराच्या विविध विभागांमध्ये जबाबदारीने कार्यरत होते. सेवानिवृत्तीने केवळ पद संपते, पण देशसेवेची भावना कधीच संपत नाही, असे ते म्हणतात. आजच्या संकटाच्या काळात त्यांच्या अनुभवाचा उपयोग लष्करासाठी आणि देशासाठी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.