कायद्याच्या शिक्षणाचा ध्यास; जीवनाचा अधुरा प्रवास; संविधानप्रेमी सोमनाथची अधुरी कहानी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 18:14 IST2024-12-17T18:12:54+5:302024-12-17T18:14:33+5:30
विधिज्ञ होण्याचा बाळगलेला ध्यास पूर्ण करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा जीवनाचा अधुरा प्रवास अनेकांमध्ये हळहळ व्यक्त करणारा ठरला.

कायद्याच्या शिक्षणाचा ध्यास; जीवनाचा अधुरा प्रवास; संविधानप्रेमी सोमनाथची अधुरी कहानी...
परभणी : घरची परिस्थिती जेमतेम, यात वडिलांचे छत्र हरवलेले आणि आईसोबत दोन भावांचा आधार असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा विधिज्ञ होण्यासाठी संघर्षमय प्रवास सुरू होता. यासाठी तो पुणे येथून परभणीमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आला होता. परभणीतील शंकर नगर भागात किरायाच्या रूममध्ये मित्रांसोबत वास्तव्यास होता. एलएल.बी. तृतीय वर्षाची परीक्षा तो देणार होता. या परीक्षेच्या आधीच त्याच्या आयुष्यात कलाटणीचा प्रसंग आला. त्यालाही तो धीराने सामोरे गेला. मात्र, विधिज्ञ होण्याचा बाळगलेला ध्यास पूर्ण करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा जीवनाचा अधुरा प्रवास अनेकांमध्ये हळहळ व्यक्त करणारा ठरला.
परभणीत रविवारी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (वय ३६) हा मूळचा लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील रहिवासी. त्याला आई आणि दोन लहान भाऊ असून, दोन्हीही भाऊ उच्चशिक्षित आहेत. सोमनाथ हा अविवाहित होता. घरच्या परिस्थितीमुळे मिळेल ते काम करण्यासाठी आई पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे राहायच्या. काही काळ तेथे सोमनाथ यानेही वास्तव्य केले. परभणीमध्ये शिवाजी विधि महाविद्यालयात तो एलएल.बी. तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. तृतीय वर्षाची परीक्षासुद्धा या आठवड्यातच सुरू होणार होती. त्यासाठी तो मित्रांसोबत शंकर नगर भागात वास्तव्यास होता. बुधवारी शहरातील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी गुन्ह्यात ताब्यात घेतले. यानंतर अवघ्या चार दिवसांत त्याचा मृत्यू झाला. यामुळे अवघ्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त करीत सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यू प्रकरणात योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. सोमवारी राज्यात हा बंद कडकडीत स्वरूपात पाळण्यात आला.
समाज माध्यमावरही भावनिक पोस्ट
संविधानप्रेमी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी तसेच कायद्याविषयी त्याला प्रचंड आवड होती. शहरात कुठेही संविधानप्रेमी संघटना, संविधानाच्या विषयी असलेल्या विविध कार्यक्रमांत तो सहभागी व्हायचा. याविषयीचे त्याचे प्रेम समाज माध्यमावर अनेकांनी भावनिक पोस्टद्वारे व्यक्त केले. मित्र असो की वास्तव्यास असलेल्या भागाचे रहिवासी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांनीसुद्धा तो अगदी मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचा हुशार विद्यार्थी असल्याची भावना बोलून दाखविली.