बस अडवून चालकास मारहाण करणाऱ्यास अद्दल घडली; न्यायालयाने ठोठावली एक वर्षाची कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:31 IST2025-03-11T19:31:16+5:302025-03-11T19:31:28+5:30
बससमोर वाहन आडवे लावून बस थांबवली, त्यानंतर काठीने चालकास केली होती मारहाण

बस अडवून चालकास मारहाण करणाऱ्यास अद्दल घडली; न्यायालयाने ठोठावली एक वर्षाची कैद
परभणी : बस अडवून चालकास मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. एफ. एम. खान यांनी १० मार्च रोजी आरोपीस एका वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली.
परभणी ते देऊळगाव या मार्गाने बसने प्रवासी घेऊन जात असताना लिंबाजी नामदेव मोरे यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन पिंगळी ते लिमला रस्त्यावर बससमोर लावले. त्यानंतर बसचालक केशव ईसापुरे यांना शिवीगाळ करून पाहून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी हे देऊळगाववरून बस घेऊन परत येत असताना पुन्हा बससमोर वाहन आडवे लावून बस थांबवली. त्यानंतर काठीने मारहाण केली, अशी फिर्याद बसचालक केशव ईसापुरे यांनी २८ ऑगस्ट २०१९ रोजी ताडकळस पोलिस ठाण्यात दिली होती.
या प्रकरणी लिंबाजी मोरे (रा. कमलापूर, ता. पूर्णा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश तावडे यांनी केला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा व सत्र न्यायालयाने सात साक्षीदार तपासले. त्यानंतर आरोपी लिंबाजी नामदेव मोरे यास १० मार्च रोजी कलम ३५३ भादंवि अन्वये एक वर्षाची साधी कैदची शिक्षा सुनावली. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ॲड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. मयूर साळापूरकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, पैरवी अंमलदार प्रमोद सूर्यवंशी, मपोशि पुष्पा जावदे, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.