लोंबकळणाऱ्या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडली, सहा एकरवरील ऊस जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:53 IST2024-11-28T17:53:01+5:302024-11-28T17:53:31+5:30
शेतकऱ्यांचा सहा एकर ऊस जळून खाक; पूर्णा तालुक्यातील निळा येथील घटना

लोंबकळणाऱ्या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडली, सहा एकरवरील ऊस जळून खाक
- विनायक देसाई
पूर्णा : तालुक्यातील निळा येथे शॉटसर्किटने आग लागून शेतकऱ्यांच्या सहा एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी १० ते १०.३० च्या सूमारास घडली.
निळा शिवार गट क्रमांक ९६ मध्ये शेतकरी ज्ञानोबा सूर्यवंशी, तुकाराम सूर्यवंशी, ओंकारेश्वर सूर्यवंशी यांनी उसाची लागवड केली होती. शेतामधून विद्युत पुरवठा करणारी मुख्य विद्युत वाहिनी जाते. आज सकाळी उसाच्या शेतामध्ये विद्युत तारांचे एकमेकाला घर्षण होऊन त्यातून ठिणग्या खाली पडल्याने उसाच्या पाचटीने पेट घेतला. काही क्षणातच आगीने सहा एकरवरील उसाला कवेत घेतले. आग नियंत्रणात न आल्याने ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. आगीची घटना सकाळी दहा ते साडेदहा दरम्यान घडली.
यानंतर शेतकरी, अर्जदाराचे चुलत भाऊ, नातेवाईक यांनी आग लागल्याची माहिती विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यास दिली. यानंतर विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर उसामध्ये एक बांध होता. त्या बांधाजवळील ऊस क्षेत्र तोडून आग नियंत्रणात आणण्यात आली. अन्यथा त्या क्षेत्रातील दुसरे अंदाजे सहा ते दहा एकर क्षेत्र बाधित होऊन खाक झाले असते, असे संबंधित शेतकऱ्यांनी माहिती दिली.
महावितरणला निवेदन सादर करणार
विद्युत वितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. यापूर्वी सुद्धा दोन वर्षांपूर्वी माझा ऊस जळून नुकसान झाले होते. दोन वर्षांपूर्वी सुद्धा तक्रार दिली होती. तारा एकमेकांना घासल्याने ठिणग्या उसात पडून ऊस पेटला. मोठ्या प्रयत्नाने आग नियंत्रणात आल्यामुळे बाकीचे क्षेत्र वाचले अन्यथा पूर्ण उसाचे क्षेत्र जळून खाक झाले असते. याबाबत महावितरणला निवेदन सादर करुन विद्युत वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करणार आहे.
- ज्ञानोबा गणपती सूर्यवंशी, शेतकरी.