दुचाकीस धक्का लागल्याचा बहाणा; सराफा व्यापारी थांबताच चोरटे कार, दागिने घेऊन पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:22 IST2024-12-20T16:19:26+5:302024-12-20T16:22:05+5:30
ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने चोरटे कार माळ रानावर सोडून पळून गेले

दुचाकीस धक्का लागल्याचा बहाणा; सराफा व्यापारी थांबताच चोरटे कार, दागिने घेऊन पसार
- सत्यशील धबडगे
मानवत: दुकान बंद करून सोनेचांदीचे दागिने बॅगमध्ये भरून कारने घराकडे निघालेल्या सराफा व्यापाऱ्यास भोसा गावाजवळ रस्त्यात अडवून चोरट्यांनी लुटल्याची घटना 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता घडली होती. दरम्यान, सराफा व्यापाऱ्याची कार आणि दागिने घेऊन पसार झालेल्या चोरट्यांचा गावकऱ्यांनी पाठलाग केला. त्यामुळे चोरटे काही अंतरावर कार आणि दागिने सोडून पळून गेले. याप्रकरणी 20 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील भोसा येथील वशिष्ट शिवाजीराव जाधव यांचे उमरी ( ता. परभणी) येथे सराफा दुकान आहे. 19 डिसेंबर रोजी सायंकाळी जाधव दुकान बंद करुन अंदाजे 4 लाख 50 हजार रुपयाचे दागिने दोन बॅगमध्ये भरुन उमरी येथून भोसा गावाकडे कारने निघाले. सायंकाळी ५. ३० वाजता भोसा गावा जवळील बाबाराव जाधव यांच्या आखाड्याजवळ एका दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली. दुचाकीस्वार आणि गाडीचे नुकसान पाहण्यासाठी जाधव यांनी कार थांबवली. याचवेळी तोंडाला मस्क लावलेला एकजण कारमध्ये शिरला. तर दुसऱ्याने लोखंडी रॉडने मारहाण करण्याची भीती दाखवली. त्यानंतर इतर चोरटे कार आणि दागिने घेऊन पसार झाले.
प्रसंगावधान राखत जाधव यांनी चोरीची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी लागलीच कारचा पाठलाग सुरू केला. ग्रामस्थांच्या हाती लागण्याच्या भीतीने चोरट्यांनी इंद्रायणी देवी माळावर कार सोडून दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप बोरकर पोउनि खिल्लारे, पोह भारत नलावडे, महेश रनेर, शेख मुन्नू, गोविंद वड, शेख मुन्नू, सिद्धेश्वर पाळवदे, बावरी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. इंद्राणी माळ परिसरात पाहणी करताना पोलिसांना झुडपामध्ये चोरट्यांनी फेकलेले दागिने आढळून आले. याप्रकरणी चार चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.