दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा क्रीडा गुण मिळणार; पण नियम कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:45+5:302021-03-25T04:17:45+5:30

शासनाच्या निर्णयानुसार खेळांच्या विविध ११ प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या ६वी ते १०वीपर्यंतच्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा ...

Tenth-twelfth grade students will get sports marks this year; But the rules remain ... | दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा क्रीडा गुण मिळणार; पण नियम कायम...

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा क्रीडा गुण मिळणार; पण नियम कायम...

शासनाच्या निर्णयानुसार खेळांच्या विविध ११ प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या ६वी ते १०वीपर्यंतच्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये

सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ते २५ पर्यंत गुण दिले जातात. मात्र, इयत्ता १०मध्ये असताना त्या विद्यार्थ्याने संबंधित क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. इयत्ता १२ मध्ये गुणांची सवलत मिळवताना त्याने १२ मध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. यावर्षीदेखील हाच नियम कायम आहे. सरत्या वर्षात कोरोनामुळे बहुतांश क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविता आला नाही. त्यामुळे या वर्षातील १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना हा नियम अडचणीचा ठरत आहे. १५ मार्चपर्यंत यासाठी प्रस्ताव दाखल करायचे होते.

दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

कोविडमुळे यावर्षी शासकीय क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे गतवर्षीच्या क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा स्तर लक्षात घेऊन त्यांना गुणदान करण्यात यावे व या संबंधीचे क्रीडा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मागवून घ्यावे आणि खेळाडूंना योग्य न्याय द्यावा.

-प्रगती दुगाणे, दहावी, पाथरी

या शैक्षणिक वर्षात शासनाच्या वतीने खेळाडूंचा भ्रमनिरास झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या क्रीडा स्पर्धांमधून प्राविण्य प्राप्त खेळाडूंना एचएससी बोर्डाने नियमाप्रमाणे गुण द्यावेत. इतर लोककलांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना गुण दिले जात आहेत, मग क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यावर अन्याय का?

- सागर भाले, दहावी, पाथरी

देशाला नवीन क्रीडाविषयक धोरण आखण्याची गरज आहे. महाराष्ट्रातून नवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी जे प्रोत्साहनपर गुण त्यांना देण्यात येत होते, ते यावर्षी देण्यात येणार नाहीत. या धोरणाचा शासनाने पुन्हा विचार करून क्रीडाविषयक चांगले धोरण आखले पाहिजे. खेळाडूंना त्यांच्या हक्काचे गुण दिले पाहिजेत.

- ओमकार घनचेकर, बारावी, सोनपेठ

खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. पुस्तकातील अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी खेळामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना गुण देणे योग्य आहे. परंतु यावर्षी हे गुण देण्यात येणार नसल्याचे समजते, हा खेळाडूंवर होणारा अन्याय आहे. यामुळे खेळाडूंचे खच्चीकरण होणार आहे. शासनाने याचा विचार करावा.

- मेघा कुरडे, बारावी, सोनपेठ

दहावी, बारावीच्या परीक्षेत खेळाडूंना ग्रेस गुण न मिळाल्यास त्यांचे नुकसान होईल. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. कोरोनामुळे यावर्षी क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे गेल्या २ वर्षात खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रातील मिळविलेले यश यावर आधारित दहावी व बारावी परीक्षार्थींना ग्रेस गुण देणे आवश्यक आहे.

- गणेश माळवे, क्रीडा शिक्षक, सेलू

दरवर्षी दहावी व बारावीमधील विद्यार्थी हे क्रीडा गुण मिळावेत, यासाठी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. यातून एक प्रकारे शारीरिक विकास घडवून येतो. यावर्षी कोरोनामुळे स्पर्धा झाल्या नसल्या तरी यापूर्वी क्रीडा स्पर्धेतील सहभाग पाहून क्रीडा गुण देणे आवश्यक आहे.

- देविदास सोन्नेकर, क्रीडा शिक्षक, सेलू

Web Title: Tenth-twelfth grade students will get sports marks this year; But the rules remain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.