लसच उपाय; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST2021-04-24T04:17:11+5:302021-04-24T04:17:11+5:30
जिल्ह्यात १ मार्चपासून आतापर्यंत २० हजार ४८२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच या कालावधीत तब्बल ४०४ जणांचा मृत्यू ...

लसच उपाय; लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही
जिल्ह्यात १ मार्चपासून आतापर्यंत २० हजार ४८२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच या कालावधीत तब्बल ४०४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग ज्या गतीने वाढला आहे, त्या गतीने जिल्ह्यात लसीकरण मात्र वाढलेले नाही. आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि कोरोना योद्धे अन्य कर्मचारी व ४५ वर्षांवरील नागरिक अशा जिल्ह्यातील एकूण ६ लाख ४८ हजार नागरिकांना लस देण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत फक्त १ लाख ३० हजार १०६ नागरिकांनीच लस घेतली आहे. हे प्रमाण फक्त २०.०७ टक्के आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत लस घेतलेल्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. शिवाय लसचे दोन डोस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणही नगण्य आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लस घेणे, हाच एकमेव मार्ग आहे. त्यासाठी या मोहिमेला गती देण्याची गरज आहे.
पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.३ टक्के पॉझिटिव्ह
जिल्ह्यातील ८९ हजार ७५५ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यातील साधारणत: ०.०४ टक्के नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
जिल्ह्यात लसीचा दुसरा डोस ७ हजार ४० जणांनी घेतला आहे. त्यातील साधारणत: ०.०३ टक्के नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणातही लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण ०.०२ ते ०.०४ टक्के इतकेच आहे. त्यामुळे कोरोना लस ही प्रभावी असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे.
लस महत्त्वाचीच; मृत्यूचा धोका कमी धोका
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे लस महत्त्वाचीच आहे. शिवाय मृत्यूचा धोकाही कमीच आहे. त्यामुळे लस घेणे हे प्रत्येकाच्याच हिताचे आहे. यासाठी या मोहिमेला गती देण्याची गरज आहे.
दिवसभरात ५ हजार जणांनी घेतली लस
जिल्ह्यात एकीकडे लसीकरणाची गती कमी असताना लसीचा पुरवठाही म्हणावा त्या प्रमाणात होत नाही. गुरुवारी रात्रीपर्यंत जिल्हा स्तरावरील उपलब्ध साठा संपला होता; परंतु जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर पाईपलाईनमध्ये जवळपास ५ हजार लस उपलब्ध होती. शुक्रवारी दिवसभर ही लस संपली आहे.