एसटीची चाके थांबली: वेतनवाढीसाठी परभणी जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 15:45 IST2021-10-28T15:40:59+5:302021-10-28T15:45:51+5:30
ST Bus Employee Strike: येथील गंगाखेड रोडवरील विभागीय कार्यशाळेसमोर सर्व विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले आहे.

एसटीची चाके थांबली: वेतनवाढीसाठी परभणी जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण
परभणी : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणामुळे ( ST Bus Employee Strike ) जिल्ह्यातील बस सेवा ठप्प पडली असून, गुरुवारी तब्बल ४०० फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी हेळसांड ( ST Bus wheels stopped) झाली. एसटी महामंडळातील ८ संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली आहे. महामंडळातील कर्मचाऱ्यांना ३ टक्के याप्रमाणे वार्षिक वेतनवाढ द्यावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता द्यावा, दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान द्यावे यासह इतर अनेक मागण्यांसाठी एसटीचे कामगार आणि कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
येथील गंगाखेड रोडवरील विभागीय कार्यशाळेसमोर सर्व विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले आहे. २८ ऑक्टोबर रोजी आगार निहाय उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यातील सुमारे २ हजार ४०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामध्ये वाहक-चालक, तांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. परभणी आगारातून दररोज १५० बस फेऱ्या होतात. त्यात लांब पल्ल्याच्या बसेसचाही समावेश आहे. गुरुवारी मात्र एकही बस आगाराच्या बाहेर पडली नाही. त्यामुळे बसस्थानक सुनसान पडले होते. प्रवासी बसची वाट पाहत होते; दुपारपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर बस येणार नसल्याचे लक्षात आल्याने प्रवाशांनी खाजगी वाहतूक व अन्य पर्याय निवडले.
एकंदर एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे बस सेवा प्रभावित झाली आहे. प्रवाशांचे ऐन सणासुदीच्या काळात हाल होत आहेत. या संघटनांचा आंदोलनात सहभाग महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, कास्ट्राईब कामगार कर्मचारी संघटना, बहुजन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार संघ. परभणी आगारातील दीडशे फेऱ्या ठप्प परभणी आगारातील कर्मचाऱ्यांनीही बेमुदत उपोषण आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे दररोज होणाऱ्या दीडशे फेऱ्या गुरूवारी रद्द झाल्यात. एकही बस आगाराच्या बाहेर पडली नाही. आगार कार्यालयासमोर बसून कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.