अचानक रानडुक्कर आडवे आल्याने भरधाव जीप उलटली; तिघेजण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 15:40 IST2021-05-21T15:38:26+5:302021-05-21T15:40:03+5:30
रानडुक्कराच्या धडकेनंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली.

अचानक रानडुक्कर आडवे आल्याने भरधाव जीप उलटली; तिघेजण गंभीर जखमी
देवगावफाटा ( परभणी ) : भरधाव वेगातील एका जीपच्या समोर अचानक रानडुक्कर आल्याने भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १ वाजता सेलूजवळ घडली. जीपच्या धडकेत रानडुक्कराचा मृत्यू झाला. तर जीप रस्त्याच्या खाली जाऊन उलटल्याने त्यातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रिसोड येथील तिघे जण जीपमधून ( एम एच 28 ए.झेड 26 41 ) पंढरपूरकडे जात होते. शुक्रवारी पहाटे १ वाजेच्यादरम्यान सेलूनजीक जिनिंग परिसरातून जाताना त्यांच्या भरधाव जीपच्या समोर रानडुकर आले. जीपने रानडुक्कराला जोरदार धडक दिली. यात रानडुक्कर ठार झाले . तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. यामुळे जीपमधील गजानन तुकाराम सोनवणे ( 38 ) , पंचफूला गजानन सोनवणे ( 34 ) व चालक असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. परभणी जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर अधिक उपचार सुरु आहेत. सेलू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख मुजरिम, पोलीस नाईक गजानन गवळी, राहुल मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.