वर्षभरातच ५६ टक्क्यांनी वाढले सोयाबीनचे तेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST2021-05-29T04:14:49+5:302021-05-29T04:14:49+5:30
भाजीपाला, किराणा व फळांच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते. तेल व मिरची मसाले यांच्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ...

वर्षभरातच ५६ टक्क्यांनी वाढले सोयाबीनचे तेल
भाजीपाला, किराणा व फळांच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते. तेल व मिरची मसाले यांच्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मध्यंतरी १०९ रुपये किलोच्या भावाने खाद्यतेल मिळायचे. आता सोयाबीन असो कि फल्लीतेल सर्वच खाद्यतेलांचे भाव चांगलेच वाढले आहे. आरोग्याच्या दृष्टीने डबल व ट्रीपल फिल्टर खाद्यतेलाला चांगलीच मागणी असते. मात्र, विविध कारणांनी खाद्यतेलाच्या भाववाढ सर्वसामान्यांचे टेंशन वाढविणारी बाब ठरली आहे. आधीच कोरोना संकटकाळामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट बळावले असताना त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे समस्येत अधिकच वाढ झाली आहे. मे २०२० मध्ये ९० रुपये प्रति किलोने मिळणारे सोयाबीनचे तेल १५८ ते १६० रुपये प्रतिकिलो वर जाऊन पोहोचले आहे. त्याचबरोबर १६०ते १७० रुपये किलोने मिळणारे करडईचे तेल प्रति किलो २०० ते २४० रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. १४० ते १७० रुपये किलोने मिळणारे शेंगदाणा तेल १८० ते १९० रुपये किलोने मिळत आहे. पाम तेलाची किंमत सर्वाधिक वाढली असून किरकोळ किंमत किलोला सध्या १३१ रुपये ६९ पैसे होती. हा अकरा वर्षांतील उच्चांक असून गेल्या वर्षी याच काळात ही किंमत ८८ रुपये २७ पैसे होती. मोहरीच्या तेलाचे किरकोळ दर मे महिन्यात १६४ रुपये ४४ पैसे होते. तेच दर गेल्या मे महिन्यात ११८ रुपये २५ पैसे होते. विशेष म्हणजे वर्षभरातच सोयाबीन तेलाच्या दरामध्ये ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अजूनही त्यात वाढ होणार काय, अशीच चर्चा बाजारपेठेत ऐकावयास मिळत आहे. प्रत्येकच वस्तू महाग होत असेल तर बजेटमध्ये घर चालवायचे तरी कसे असा प्रश्न गृहिणींसमोर निर्माण झाला आहे. आधीच गॅस सिलिंडर्सच्या दरामुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच खाद्यतेलाच्या भाववाढीमुळे आगीत अजून तेल ओतण्याचे कार्य सुरु आहे काय, असेच जाणवायला लागले आहे. यावर गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
तेल (प्रति किलो) मे २०२० मे २०२१
सोयाबीन ९० १६०
शेंगदाणा १४० १९०
करडई १६० २२०
पाम ८८ १३१
मोहरी ११८ १६४
तेलाच्या भावावर नियंत्रण गरजेचे
जिल्ह्यात कोरोणाने अनेक कामगारांचे रोजगार गेले तर कित्येक नागरिकांचे संसार उघड्यावर आले. खाद्यतेल हे जीवनावश्यक असून गेल्या काही दिवसापासून खाद्य तेलाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. शेंगदाणे तेल, सूर्यफूल तेलाचे भाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. तेलाच्या भाववाढीमुळे सर्व खाद्यपदार्थांचे भाव वाढत असल्याने गोरगरीब जनता मेटाकुटीस आली आहे. तेल जीवनावश्यक असल्याने कितीही महाग झाले तरी घ्यावेच लागते. ग्रामीण भागातील दिवाबत्ती करण्याकरिता लागणारे राॅकेल बंद केल्यामुळे विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला तर खाद्यतेलाचे दिवे घरात लावावे लागत आहेत. त्यामुळे तेलाचा वापर करावाच लागतो. खाद्यतेलाच्या भावावर सरकारने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.