सोमनाथच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे; आंबेडकरी अनुयायांचा स्थानिक पोलिसांवर रोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 18:11 IST2024-12-17T18:11:33+5:302024-12-17T18:11:55+5:30
या प्रकरणात आता राज्य सरकार असो की पोलीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

सोमनाथच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे; आंबेडकरी अनुयायांचा स्थानिक पोलिसांवर रोष
परभणी : न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाचे प्रथमदर्शनी अहवाल समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या अंगावरील मारहाणीच्या जखमा वरुन आता रोष पोलीसांवर वाढला आहे. या घटनेचा तपास आपोआपच सीआयडीकडे जाणार आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करीत जिल्हासह राज्यभरातून आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त केला. यामध्ये स्थानिक पोलीस प्रशासनावर तीव्र रोष असून आता या मृत्यू प्रकरणाचा तपास नेमका कोणाकडे राहणार असा प्रश्न पडला होता. हा तपास सीआयडीकडेच वर्ग व्हावा, तपासाला गती यावी अशी राज्यातील प्रमुख नेत्यांनी परभणीत भेटीदरम्यान मागणी केली होती. मात्र, आता शासन नियमानुसार सीआयडीकडे तपास वर्ग करावा लागतो.
भूमिकेकडे लागले लक्ष
न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या अशा घटनांमध्ये तपास हा राज्यस्तरावरून नेमलेल्या सीआयडी पथकाकडेच दिला जातो, असेच आजपर्यंत घडलेल्या गंभीर गुन्ह्यातही समोर आले आहे. या प्रकरणात आता राज्य सरकार असो की पोलीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
स्थानिक पोलीस अधिकारी मुग गिळून गप्प
धरणे आंदोलन असो की विविध प्रमुख संघटना तसेच पाहणीसाठी आलेले राज्यातील नेते, आंबेडकरी अनुयायी यांच्याकडून आता तपास प्रक्रिया जलदगतीने कधी सुरू होणार ? तपास कोण करणार ? याचा आग्रह धरला जात आहे. एकीकडे स्थानिक पोलिस यंत्रणे वरचा रोष पाहता हा तपास सीआयडीकडेच वर्ग व्हावा अशी प्रमुख मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे, याबाबत स्थानिक पोलीस अधिकारी तोंडावर बोट ठेवून कुठलीही प्रतिक्रिया देत नसल्याने तपास सीआयडीकडे वर्ग कधी होणार याचीच प्रतीक्षा आहे.