सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 20:08 IST2024-12-18T20:07:06+5:302024-12-18T20:08:05+5:30
शहरातील ११ डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलन प्रकरणात नवा मोंढा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी (३६) यास ताब्यात घेतले होते.

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे
परभणी : सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणात नानलपेठ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंतिम अहवाल येईपर्यंत हे प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडेच राहणार असून गुन्हा दाखल झाल्यानंतरच ते कोणत्या तपास यंत्रणेकडे जाईल, हे कळणार आहे.
न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात इनक्वेस्ट पंचनामा करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासह पोलिस आणि आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या सर्व प्रकरणात प्राथमिक चौकशी ही प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे सध्या असून त्यांच्या चौकशीनंतर अहवालानुसार पुढे गुन्हा नोंद प्रक्रिया किंवा तपास कोणाकडे वळती होणार याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.
शहरातील ११ डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलन प्रकरणात नवा मोंढा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी (३६) यास ताब्यात घेतले होते. त्याला दोन दिवस पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती. १५ डिसेंबर रोजी सकाळी न्यायालयीन कोठडीत सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर परभणी जिल्हा रुग्णालयात इनक्वेस्ट पंचनामा झाला. त्यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परभणी, उपविभागीय अधिकारी परभणी, पोलिस, आरोग्य यंत्रणेचे अधिकारी व तुरुंग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यातील सर्व प्राथमिक चौकशी व विविध बाबी याचा अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडून पुढे सादर केल्यावर त्यात दोषी असणाऱ्यांवर स्वतंत्र गुन्हा किंवा तपास कोणाकडे वर्ग होणार याची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नानलपेठ ठाण्यात आधी आकस्मिक मृत्यूची नोंद
नवा मोंढा ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या सर्व चौकशी आणि अहवालानंतर पुढील तपासाची दिशा सोबतच दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्याचा तपास यंत्रणा ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.