सहा महिन्यांत १२६० वन्यजिवांनी गमावले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:04+5:302021-04-02T04:17:04+5:30
परभणी : जिंतूर तालुक्याच्या ५० कि.मी.च्या परिघात मागच्या सहा महिन्यांत तब्बल १ हजार २६० वन्यजिवांना प्राण गमवावे लागले. त्याच्या ...

सहा महिन्यांत १२६० वन्यजिवांनी गमावले प्राण
परभणी : जिंतूर तालुक्याच्या ५० कि.मी.च्या परिघात मागच्या सहा महिन्यांत तब्बल १ हजार २६० वन्यजिवांना प्राण गमवावे लागले. त्याच्या नोंदी मात्र कुठेही नाहीत. जिंतुरातील वन्यजीव अभ्यासकांनी या नोंदी घेऊन रस्ते अपघातातील वन्यजिवांच्या मृत्यूचे गांभीर्य प्रशासनासमोर मांडले आहे. त्यामुळे पर्यावरणातील या महत्त्वाच्या घटकाच्या अपघाती मृत्यूकडे शासन- प्रशासन गांभीर्याने पाहणार आहे की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
वाढते शहरीकरण आणि त्यात वाढलेल्या दळण-वळणाच्या समस्यांमुळे रस्ते अपघात ही नवी समस्या पुढे येत आहे. या अपघातात मानवी मृत्यूच्या नोंदी प्रशासन घेत असले तरी प्राण्यांच्या मृत्यूबाबत फारसे गांभीर्य घेतले जात नाही. पर्यावरणाच्या संवर्धनात वन्यजिवांचाही तेवढाच वाटा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील पक्षिमित्र अनिल उरटवाड यांनी ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२१ या काळातील वन्यजिवांच्या अपघाती मृत्यूच्या नोंदी घेतल्या. जिंतूर तालुक्यातील ५० कि.मी. परिसरातच त्यांनी या नोंदी घेतल्या, तर त्याचा आकडा सहा महिन्यांत एक हजारांपेक्षाही पुढे आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात ही संख्या किती असेल याचा अंदाज बांधता येईल. यावरून वन्यजिवांचे रस्ते अपघात हा गंभीर विषय पुढे येत आहे. वनविभागासह उपप्रादेशिक परिवहन विभागाने यात पुढाकार घेऊन खबरदारी घेण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. मात्र त्यात वन्यजिवांच्या मृत्यूविषयी साधा उल्लेखही नसतो. त्यामुळे शासनाचे आता या विषयाचे गांभीर्य ओळखून पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
अधिवास हिरावल्याने समस्या गंभीर
पक्षी अभ्यासक अनिल उरटवाड यांनी सांगितले, परभणी जिल्ह्यातील जैवविविधता अनेक संकटांना सामोरी जात आहे. वन्यजिवांची शिकार, विषप्रयोग, त्यांच्या अधिवासावर झालेले अतिक्रमण, वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण या कारणांमुळे वन्यजीवन धोक्यात आले आहे. शेती आणि खाणकामामुळे वन्यजिवांचे विविध प्रकारचे अधिवास नष्ट झाले. वन्यजिवांपैकी उदमांजर, रानमांजर, मांस भक्षक अन्न पाण्याच्या शोधात दररोज किमान २० ते २५ कि.मी.चा प्रवास करीत असतात. या दरम्यान ते मानवी वस्ती, द्रुतगती मार्गावर सहज येतात. प्राणी आणि पक्ष्यांचे नेहमीच स्थलांतर होते. एका पेक्षा अधिक अधिवासांचा ते वापर करतात. दरवर्षी लाखो पक्षी, प्राणी रस्त्यांवरील वाहनांच्या अपघातात जीव गमावतात. परभणी जिल्ह्यातही ही संख्या मोठी आहे. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
ऑक्टोबर २० ते मार्च २१ या काळातील अपघाती मृत्यू
पक्षी : ७२०
साप : २००
प्राणी : ३४०
एकूण १२६०