शेत रस्त्याच्या कारणातुन वृद्धास मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 19:19 IST2018-06-14T19:19:34+5:302018-06-14T19:19:34+5:30
'आमच्या शेतात जाण्यासाठी तुझ्या शेतातुन रस्ता देणार आहेस का नाही', असे म्हणत वृध्द इसमास मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील मालेवाडी येथे घडली.

शेत रस्त्याच्या कारणातुन वृद्धास मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गंगाखेड (परभणी ) : 'आमच्या शेतात जाण्यासाठी तुझ्या शेतातुन रस्ता देणार आहेस का नाही', असे म्हणत वृध्द इसमास मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील मालेवाडी येथे घडली. याप्रकरणी दि. १४ जुन रोजी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील मालेवाडी येथील शेतकरी बाबुसिंग मदनसिंग चंदेल (६०) शनिवारी ( दि.९) सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास शेतात होते. या दरम्यान तिथे आलेल्या १) पदमसिंग कवरसिंग ठाकुर, २) शिवसिंग कवरसिंग ठाकुर, ३) जितेंद्रसिंग कवरसिंग ठाकुर, ४) शरदसिंग शिवसिंग ठाकुर (सर्व रा. मालेवाडी ) व अन्य दोन अनोळखी इसमानी आम्हाला तुझ्या शेतामधुन आमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता देणार आहेस का नाही आत्ताच सांग असा दम दिला. यावर चंदेल यांनी रस्ता दिल्यास माझ्या शेताचे नुकसान होईल त्यामुळे मी वापरासाठी माझ्या शेतातून रस्ता देणार नाही असे म्हटले.
यावरून त्या सर्वांनी चंदेल यांना शिविगाळ करून थापड बुक्या, लोखंडी गज- पाईप, काठीने मारहाण करत जखमी केले. तसेच करत रस्ता दिला नाही तर तुला जीवे मारू अशी धमकी. अशी फिर्याद परभणी येथील रुग्णालयात उपचार घेतांना बाबुसिंग चंदेल यांनी दिली. यावरून आज गंगाखेड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार सुरेश पाटील, पोशि. नारायण शितळे करीत आहेत.