गंगाखेडमध्ये अवैध सावकाराच्या दोन घरांवर एकाचवेळी छापे, आक्षेपार्ह दस्तावेज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:45 IST2025-07-18T17:45:46+5:302025-07-18T17:45:46+5:30
घरातून आक्षेपार्ह आणि सावकारी व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे सापडली आहेत

गंगाखेडमध्ये अवैध सावकाराच्या दोन घरांवर एकाचवेळी छापे, आक्षेपार्ह दस्तावेज जप्त
- प्रमोद साळवे
गंगाखेड (जि. परभणी) : अवैध सावकारी प्रकरणी जिल्हा सहकार विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. १८ जुलै) सकाळी सिद्धेश्वर मंचकराव नागरगोजे यांच्या गंगाखेड तालुक्यातील दामपुरी आणि लेक्चर कॉलनी येथील घरांवर एकाचवेळी छापे टाकत कारवाई केली. यावेळी पथकाने काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत.
तक्रारदार दुर्गाजी शिवाजी आडे (रा. बेलवाडी तांडा) यांनी २९ मे रोजी नागरगोजे यांच्याविरोधात परभणी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर कारवाई करत जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली होती. सकाळी ८:३० वाजता दोन ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत ही घरझडती घेण्यात आली. नागरगोजे यांच्या घरातून आक्षेपार्ह आणि सावकारी व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे सापडल्याने ती जप्त करण्यात आली असून पुढील तपासासाठी वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात आला आहे.
या छापेमारी पथकात सहकार अधिकारी बी.एस. कुरुडे, श्रीमती एस.एस. गोरे, एम.के. सय्यद, एन.एन. पुंजारे यांच्यासह पोलीस कर्मचारी एम. एस. माहोरे, जी. एन. पौळ, एस. एस. जिंकलवाड, श्रीकृष्ण मुंडे, वर्षा थडवे, शासकीय पंच आणि व्हिडिओग्राफर यांचा समावेश होता. कारवाईसाठी सहाय्यक निबंधक ए.जी. निकम यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत होते.