धक्कादायक ! शेतकऱ्याने भर रस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:29 IST2018-04-16T16:25:03+5:302018-04-16T16:29:18+5:30
आर्थिक विवंचनेत असलेल्या एका शेतकऱ्याने भररस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथे रविवारी रात्री घडली.

धक्कादायक ! शेतकऱ्याने भर रस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून संपवले जीवन
परभणी : आर्थिक विवंचनेत असलेल्या एका शेतकऱ्याने भररस्त्यात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथे रविवारी रात्री घडली. शिवाजी बाबासाहेब घंडगे (५५ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
शिवाजी घंडगे हे पाथरगव्हाण येथे पत्नी, ३ मुली व २ मुलांसोबत राहतात. त्यांच्या दोन मुलीचे लग्न झाले आहे. गावाशेजारीच त्यांची ८ एकर शेती आहे. काही दिवसांपूर्वी शेतीवर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून २ लाख ५० हजार रुपये कर्ज होते. गेल्या दोन वर्षात त्यांना शेतीतून काही उत्पन्न मिळाले नाही. यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची बनली. बोंड अळीने त्यांच्या कापसाला उत्पादन झाले नाही. यासोबतच याच्या विम्याची रक्कमपण त्यांना मिळाली नाही. गतवर्षी त्यांना १८ हजार रुपयाचा पीकविमा मंजूर झाला होता. मात्र, जिल्हा बँकेने ती रक्कम कर्ज खात्यात जमा करून घेतली. यातच त्यांना मुलीच्या लग्नाची चिंता सतावत होती.
याच विंवचनेत रविवारी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान घंडगे आपल्या राहत्या घरातील विषारी द्रव्याचा डब्बा घेऊन रस्त्यावर आले. रस्त्यावर उभ्या असलेल्या काही ग्रामस्थांना ही बाब लक्षात आली मात्र कोणाला काही कळायच्या आत त्यांनी ते द्रव्य प्राशन केले. यानंतर त्यांना गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच मध्यरात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पाथरी पोलीस अधिक तपास करत आहे.