धक्कादायक! रस्त्याच्या कडेला झुडपात फेकले चार महिन्यांचे अर्भक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:15 IST2025-01-22T13:15:23+5:302025-01-22T13:15:59+5:30
मंगरूळ ते रामपुरी रस्ता तसेच इतर रस्त्यावरील काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिस करणार आहेत

धक्कादायक! रस्त्याच्या कडेला झुडपात फेकले चार महिन्यांचे अर्भक
- सत्यशील धबडगे
मानवत: तालुक्यातील मंगरूळ बु. ते रामपुरी रस्त्याच्या कडेला झूडपात अंदाजे तीन चार महिन्याचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
मानवत तालुक्यातील मंगरूळ ते रामपुरी रस्त्यावरून जाणाऱ्या दूध विक्रेत्यांना सकाळी 6:30 वाजता रस्त्याच्या कडेला झुडपात कागदामध्ये काहीतरी संशयास्पद दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता त्यात अर्भक आढळून आले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस हवालदार भरत नलावडे, सिद्धेश्वर पाळवदे, महेश रणेर, बंकट लटपटे, अनिल लबडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अर्भक अंदाजे तीन ते चार महिन्याचे असल्याचे प्राथमिकरित्या दिसून येत आहे. वैद्यकीय तपासणीनंतर अर्भक स्त्री जातीचे आहे की पुरुष जातीचे हे समोर येणार आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
मंगरूळ ते रामपुरी रस्ता तसेच इतर रस्त्यावरील काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. कॅमेर्यांमधील फुटेजची तपासणी पोलीस पथकाकडून केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.