शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना; विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारली भव्यदिव्य प्रतिमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:11 IST2025-02-17T13:09:12+5:302025-02-17T13:11:15+5:30
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कौसडी जि. प. प्रशाला शाळेच्या मैदानावर विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे भव्यदिव्य अशी प्रतिकृती साकारत अनोखी मानवंदना दिली.

शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना; विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारली भव्यदिव्य प्रतिमा
बोरी ( परभणी) : जिंतूर तालुक्यातील कौसडी जि. प. प्रशाला शाळेच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शनिवारी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे भव्यदिव्य अशी प्रतिकृती प्रशालेच्या प्रांगणात साकारली. ९ हजार ९९५ स्क्वेअर फुटांमध्ये तब्बल ९९५ विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारून अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली.
गावातील जि. प. प्रशाला कौसडी, केंद्रीय प्राथमिक शाळा, प्राथमिक उर्दू शाळा, कन्या शाळा, संत तुकाराम उर्दू माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा बसवेश्वरनगर, स्कॉलर इंग्लिश स्कूल गुळखंड फाटा व कौसडी येथील अंगणवाडी, असे एकूण तब्बल ९९५ विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून साकारून अनोखी मानवंदना देण्यात आली. डोळ्यांचे पारणे फेडणारी तब्बल ९ हजार ९९५ स्क्वेअर फुटांतील कलाकृती रांगोळीकार ज्ञानेश्वर आप्पाराव बर्वे यांनी परिश्रम घेऊन तयार केली.
शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना; ९ हजार ९९५ स्क्वेअर फुटांमध्ये तब्बल ९९५ विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारली शिवाजी महाराजांची प्रतिकृती #ShivajiMaharaj#parabhani#marathwada#shivjayantipic.twitter.com/7AKko1XEXH
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) February 17, 2025
कला शिक्षक ज्ञानेश्वर बर्वे यांना प्रतिमा साकारण्यासाठी विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्यदिव्य प्रतिकृती पाहून कौसडी ग्रामस्थांनी महाराष्ट्रात शिवबा यांचा जन्म झाल्याचा सार्थ अभिमान व्यक्त केला. याप्रसंगी कौसडी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश पांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ज्ञानेश्वर बर्वे यांचा सत्कार सरपंच, अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपस्थित ग्रामस्थांनी केला. त्याचबरोबर मानवी साखळीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे चित्रीकरण ड्रोन कॅमेराद्वारे करण्यात आले.