रमाई घरकुलासाठी शिवसेनेचे महापालिकेत पुन्हा उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 19:09 IST2018-07-16T19:08:00+5:302018-07-16T19:09:02+5:30
महानगरपालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेत सुमारे ४५० लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरविल्याने शिवसेनेने आजपासून पुन्हा उपोषणाला प्रारंभ केला.

रमाई घरकुलासाठी शिवसेनेचे महापालिकेत पुन्हा उपोषण
परभणी- महानगरपालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेत सुमारे ४५० लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरविल्याने शिवसेनेने आजपासून पुन्हा उपोषणाला प्रारंभ केला.
रमाई घरकुल योजनेचा प्रश्न जिल्ह्यात गाजला होता. १५ दिवसांपूर्वी आ.डॉ.राहुल पाटील यांनी मनपाला घेराव आंदोलन केल्यानंतर महापालिकेने योजनेतील लाभार्थ्याच्या निवडीची प्रक्रिया सुरु केली. निधी असतानाही लाभ मिळत नसल्याने मनपाच्या धोरणाविरुद्ध संताप व्यक्त झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या प्रकरणात मनपाच्या भूमिकेविरुद्ध शिवसेनेचे नगरसेवक सुशील कांबळे यांनी लाभार्थ्यांसह उपोषणाला सुरुवात केली आहे.
रमाई घरकुल योजनेमध्ये लाभार्थी निवडताना अनेक गोरगरीब लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. काही जणांना डीपी प्लॅनचे कारण देत अर्ज बाद केले. तर काहींचे अर्ज रेल्वेची हद्द आणि कॅनॉल परिसरात जागा असल्याने एनओसी नसल्याचे कारण देत अर्ज बाद करण्यात आले आहेत. सुमारे ४५० अर्ज महापालिकेने बाद केले असून या गोरगरीब लाभार्थ्यांचा प्रश्न उचलून धरत सुशील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून लाभार्थ्यानी महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.