उद्यापासून सात दिवसांची संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:18 IST2021-03-23T04:18:45+5:302021-03-23T04:18:45+5:30
मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात मागच्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा उद्रेक होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले ...

उद्यापासून सात दिवसांची संचारबंदी
मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात मागच्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा उद्रेक होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज २०० पेक्षाही अधिक रुग्ण नोंद होत असल्याने आता प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जिल्हा प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संचारबंदीचा पर्याय निवडण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते ३१ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जिल्हाभरात संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत. त्यामुळे बुधवारपासून जिल्ह्यात सर्व बाजारपेठ तसेच इतर आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
२० दिवसांत २४७० रुग्ण
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केल्या जात आहेत. १ मार्चपासून ते २० मार्चपर्यंत २हजार ४७० रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे १५ ते २० मार्च या पाच दिवसांमध्ये १ हजार ७५८ रुग्ण नोंद झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा वाढलेला आलेख लक्षात घेता संचारबंदीचा पर्याय निवडण्यात आला आहे.
पराजिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना
जिल्हाबंदी
परभणी : बाहेर जिल्ह्यांतून परभणीत ये-जा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असून, हा संसर्ग रोखण्यासाठी नोकरीच्या निमित्ताने अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. बाहेर जिल्ह्यात जाण्यास कर्मचाऱ्यांना बंदी घातली आहे. तसेच बाहेर जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी हे आदेश काढले.
मास्क न वापरल्यास आता क्वाॅरंटाइन
परभणी : मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आल्यास संबंधितास ताब्यात घेऊन त्याला एक दिवसासाठी क्वाॅरंटाइन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी प्रशासन उपाय करीत असताना नागरिक मात्र त्याचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. परभणी शहरात मास्क न वापरता फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तीस ताब्यात घेऊन रेणुका मंगल कार्यालयात एक दिवसासाठी क्वाॅरंटाइन करण्यात येणार असून, या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणीही केली जाणार आहे.