संभाव्य पॅनलप्रमुख स्थलांतरित मतदारांच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST2020-12-13T04:32:07+5:302020-12-13T04:32:07+5:30
जिंतूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामाच्या शोधामध्ये जिंतूर तालुक्यामधील ४७ तांडे व ३० वाडीवस्त्यांवरील जवळपास २९ हजार मतदार स्थलांतरित ...

संभाव्य पॅनलप्रमुख स्थलांतरित मतदारांच्या शोधात
जिंतूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामाच्या शोधामध्ये जिंतूर तालुक्यामधील ४७ तांडे व ३० वाडीवस्त्यांवरील जवळपास २९ हजार मतदार स्थलांतरित झाले आहेत. तालुक्यातील १०१ ग्रामपंचायत निवडणुकीत स्थलांतरित मतदारांच्या शोधात पॅनलप्रमुख लागले आहेत.
जिंतूर तालुक्यात १७० गावे असून, ४७ तांडे व जवळपास ३० वाडी-वस्त्या आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेती हेच असल्याने मोठ्या प्रमाणावर या भागातील मजूर कामाच्या शोधासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नगर, नागपूर, सुरत या भागांमध्ये जातात. तालुक्यातील जवळपास २९ हजार मजूर कामासाठी बाहेरगावी होते; परंतु ८ महिन्यांत कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन झाले. त्यामुळे हे मजूर गावी परतले होते; परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हे मजूर परत ऊसतोड व कामाच्या शोधात महानगरात परतले आहेत. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूक लागल्याने त्यांना मतदान करण्यासाठी मूळ गावी यावे लागणार आहे. जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार या सर्कलमध्ये जवळपास १३ तांडे असून, आडगाव तांडा, सरोज तांडा, भुसकवडी तांडा, मोहखेड तांडा आदी तांड्यांचा यात समावेश आहे. या तांड्यांवरील जवळपास ६ ते ७ हजार मजूर कामाच्या शोधासाठी बाहेरगावी गेले आहेत. चारठाणा सर्कलमध्ये १२ तांडे असून, यामध्ये गारखेडा तांडा, राजेगाव तांडा, जांब तांडा, सायखेडा यासह १२ ते १३ तांडे आहेत. या सर्कलमधून साधारणत: साडेतीन हजार ते ४ हजार मजूर महानगरात कामासाठी गेले आहेत. वझर सर्कलमध्ये १२ तांड्यांचा समावेश असून, या तांड्यांतून जवळपास ३ हजारांपेक्षा जास्त मजूर बाहेरगावी आहेत. भोगाव सर्कलमध्ये घेवडा तांडा, पोखर्णी तांडा, खरदखी तांडा आदी ७ तांड्यांतून १ हजार मजूर बाहेरगावी गेले आहेत. सावंगी म्हाळसा सर्कलअंतर्गत ७ तांडे असून, या तांड्यांतील दीड ते दोन हजार कामगार बाहेरगावी आहेत. बोरी सर्कलमधून साधारणत: ३ हजार मजूर बाहेर असून हीच परस्थिती वस्सा, कौसडी, वरूड सर्कलची आहे. तालुक्यात जवळपास ३० वाडी- वस्त्या असून, यामधून ४ ते ५ हजार कामगार कामाच्या शोधात बाहेरगावी आहेत. त्यामुळे २९ हजार मजुरांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांना परत आणण्यासाठी पॅनलप्रमुखांनी यंत्रणा कामाला लावली आहे.
स्थलांतरित मतदारांत अनेक संभाव्य उमेदवार
गावगाड्यात पॅनल तयार करताना उमेदवाराकडे असलेली मतांची संख्या लक्षात घेतली जाते. अनेक संभाव्य उमेदवार ऊसतोडीसाठी गेले असल्याने त्यांना तातडीने गावात परतण्यासाठी निरोप देण्यात आले आहेत. वाॅर्ड आरक्षण, मतांची संख्या व पॅनलप्रमुखावर असलेली निष्ठा यावरच ही निवडणूक अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.