सतीश चव्हाण यांच्या पाहणीत १४ व्हेंटिलेटर आढळले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST2021-05-23T04:16:55+5:302021-05-23T04:16:55+5:30
परभणी : येथील जिल्हा रुग्णालयासाठी पीएम केअर फंडातून दिलेल्या १५ व्हेंटिलेटरपैकी १४ व्हेंटिलेटर बंद असल्याची बाब आ. सतीश चव्हाण ...

सतीश चव्हाण यांच्या पाहणीत १४ व्हेंटिलेटर आढळले बंद
परभणी : येथील जिल्हा रुग्णालयासाठी पीएम केअर फंडातून दिलेल्या १५ व्हेंटिलेटरपैकी १४ व्हेंटिलेटर बंद असल्याची बाब आ. सतीश चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात केलेल्या पाहणीमध्ये दिसून आली. त्यामुळे मोफत मिळाले म्हणून काहीही वापरून रुग्णांच्या जीवाशी खेळणार का, असा सवाल आ. सतीश चव्हाण यांनी केला आहे.
पीएम केअर फंडातून औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयास ज्योती सीएनसी कंंपनीने धमन -३ या मॉडेलचे १०० व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. त्यापैकी १५ व्हेंटिलेटर परभणी येथील जिल्हा रुग्णालयास वापरासाठी दिले होते. या व्हेंटिलेटरपैकी किती व्हेंटिलेटर वापरात आहेत, याची प्रत्यक्ष पाहणी आ. सतीश चव्हाण यांनी शनिवारी केली. जिल्हा रुग्णालयाला भेट दिली त्यावेळी १५ पैकी एकच व्हेंटिलेटर बायपॅप मोडवर वापरले जात असून, उर्वरित १४ व्हेंटिलेटर एका खोलीत मांडून ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे हे व्हेंटिलेटर आहेत की बायपॅप याचा प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी केली. ज्यावेळी तुम्हाला हे व्हेंटिलेटर प्राप्त झाले तेव्हा तपासून घेतले होते का? न तपासताच ते कसे काय स्वीकारले, मोफत मिळाले म्हणून काहीही वापरणार का? असा सवाल आ. चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच व्हेंटिलेटर आयसीयू कक्षात वापरण्यायोग्य नसेल तर परत करावेत, अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना दिल्या. यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर, ॲड. स्वराजसिंह परिहार, नारायण चौधरी आदींची उपस्थिती होती.
पीएम केअर फंडातून दिलेल्या व्हेंटिलेटरची पाहणी करताना आ. सतीश चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे.