महसूल पथकास धक्काबुकी करून वाळू माफियांनी टिप्पर पळवले; दोघांना सहा महिने कारावास

By राजन मगरुळकर | Updated: May 3, 2025 19:17 IST2025-05-03T19:15:21+5:302025-05-03T19:17:39+5:30

परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला निकाल

Sand tipper snatched by revenue team; two sentenced to six months in prison | महसूल पथकास धक्काबुकी करून वाळू माफियांनी टिप्पर पळवले; दोघांना सहा महिने कारावास

महसूल पथकास धक्काबुकी करून वाळू माफियांनी टिप्पर पळवले; दोघांना सहा महिने कारावास

परभणी : तहसीलचे पथक कारवाईस गेले असता त्यांना दोन जणांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने दाखल गुन्ह्यात दोन जणांना दोषी ठरवून सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

तहसीलदार पूर्णा श्याम मदनुरकर यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात २९ जानेवारी २०१८ मध्ये गुन्हा दाखल केला होता. तहसीलचे पथक कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी एक वाहन अवैधपणे वाळू घेऊन येताना दिसले. वाहन थांबविण्याचा इशारा केला. चालकास नाव विचारले असता त्याने राजू गोविंद जटाळे व टिप्पर मालक राजू सोळंके असे सांगितले. माहितीच्या आधारे व्हिडिओ चित्रीकरण केले. काही वेळात तेथे टिप्पर मालक याने येऊन जबरदस्तीने कॉलर पकडून धक्काबुक्की केली व टिप्पर घेऊन गेल्याची फिर्याद पूर्णा ठाण्यात दिली. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील ओव्हळ यांनी केला. 

नऊ साक्षीदार तपासले, सहा महिन्यांची शिक्षा
या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश के.एफ.एम.खान यांनी सर्व साक्षपुराव्याचे अवलोकन करून शुक्रवारी आरोपी राजेश उर्फ राजू पिराजी साळुंखे आणि राजू गोविंदराव जटाळे यास भादवि कलम ३५३ अन्वये दोषी ठरवून सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा प्रत्येकी सुनावली. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे, सरकारी अभियोक्ता सुहास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता देवयानी सरदेशपांडे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सुरेश चव्हाण, अंमलदार प्रमोद सूर्यवंशी, राजू दहिफळे, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.

Web Title: Sand tipper snatched by revenue team; two sentenced to six months in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.