थकबाकी नसल्याने एस. टी.च्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST2021-05-23T04:16:42+5:302021-05-23T04:16:42+5:30
परभणी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने एस. टी.चे उत्पन्न बंद झाले आहे. त्यातच एस. टी. महामंडळाची ...

थकबाकी नसल्याने एस. टी.च्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न
परभणी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने एस. टी.चे उत्पन्न बंद झाले आहे. त्यातच एस. टी. महामंडळाची इतर विभागांकडे असलेली थकबाकीही वसूल झाली आहे. त्यामुळे एस. टी.च्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ अशा ७ आगारांचा समावेश आहे. या आगारांमध्ये २ हजार ३७६ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांवर महिन्याकाठी ६ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च पगारापोटी करण्यात येतो. मात्र, मागील काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या संचारबंदीमुळे एस. टी.ची सेवा ठप्प आहे. त्यामुळे उत्पन्नही बंद झाले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा पगार करायचा कसा, असा प्रश्न एस. टी. महामंडळ प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. शासनाने पैसे दिले तरच कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकतील.
केवळ मालवाहतूक सेवा सुरु
परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत अत्यावश्यक बससेवेला प्रवासी मिळत नसल्याने बससेवा ठप्प आहे. त्यामुळे उत्पन्नाचा मार्ग म्हणून एस. टी. महामंडळाने सुरु केलेल्या मालवाहतूक सेवेलाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. दिवसाकाठी केवळ ९० हजार रुपयांच्या उत्पन्नावर समाधान मानावे लागत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे बससेवा ठप्प आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत पगार मिळाला आहे. यापुढे पगार मिळविण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
- गोविंद वैद्य, कर्मचारी
वर्षभरापासून वैद्यकीय खर्च दाखल केला आहे. मात्र, उत्पन्न मिळत नसल्याचे कारण देत अद्यापही हा खर्च मिळालेला नाही. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- कृष्णा राडकर, चालक
एस. टी. महामंडळ प्रशासनाकडून एप्रिल महिन्यापर्यंतचा पगार देण्यात आला आहे. मात्र, एलआयसीचे हप्ते अद्यापही भरलेेले नाहीत.
- रामभाऊ देवगुंडे, चालक