मृताच्या हातावर 'रूपाली' टॅटू, परभणीत अपहरण करून खूनामागे आर्थिक वाद की प्रेम प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:09 IST2025-07-14T12:08:18+5:302025-07-14T12:09:05+5:30

अपहृत युवकाचा कॅनॉलजवळ आढळला मृतदेह; मयत परभणी तालुक्यातील संबर येथील रहिवासी

'Rupali' tattoo on the deceased's Onkar Gaikwad hand, was the kidnapping and murder in Parbhani a financial dispute or a love affair? | मृताच्या हातावर 'रूपाली' टॅटू, परभणीत अपहरण करून खूनामागे आर्थिक वाद की प्रेम प्रकरण?

मृताच्या हातावर 'रूपाली' टॅटू, परभणीत अपहरण करून खूनामागे आर्थिक वाद की प्रेम प्रकरण?

सेलू (जि. परभणी) : सेलू ते देवगावफाटा रस्त्यावर मोरेगाव कॅनॉलजवळ रविवारी सकाळी ७ च्या सुमारास युवकाचा मृतदेह आढळला. मयताचे शनिवारी रात्री १०:३० वाजता अपहरण झाले व त्यानंतर खून झाला, असा प्रकार पुढे आला आहे. मयत युवकाची ओळख पटली असून, ओंकार बन्सीधर गायकवाड (२८, रा. संबर, परभणी), असे त्याचे नाव आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सेलूचे सपोनि. संजय चव्हाण, उपनिरीक्षक बलभीम राऊत, विष्णुदास गरुड, अजय रासकटला, संजय गवते, नितीन राठोड, जगन्नाथ मुंढे, साधन कांगणे, पोलिस पाटील तुळशीराम मगर दाखल झाले होते. त्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे आले. मृताच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ इंग्रजी अक्षरात 'रूपाली' असे नाव गोंदलेले आढळले. या आधारे मृताची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असतानाच मयत युवकाचे नाव ओंकार बन्सीधर गायकवाड (संबर, परभणी), अशी ओळख पटली. या युवकाचे शनिवारी रात्री १०:३० वाजता चौघांनी कारमधून अपहरण केल्याची माहिती समोर आली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून भौतिक पुरावे गोळा केले. फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीस सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

अशी घडली घटना
शनिवारी रात्री १०:३० वाजता संबर येथून ओंकार गायकवाड याचे पप्पू वैद्य (रा. बोबडे टाकळी) व इतर अनोळखी तिघांनी कारमधून अपहरण केले. ओंकार, दिनकर गायकवाड आणि नातेवाईक अनिकेत साळवे हे चौफुलीवर बसले असताना पप्पू वैद्यने तू पैसे का देत नाहीस? असे म्हणत जबरदस्तीने ओंकारला कारमध्ये बसवले. ओंकार आणि पप्पू वैद्य यांचा ट्रॅक्टरचा व्यवसाय होता. पप्पूने यापूर्वी ओंकारकडून ५२ हजार रुपये घेतले होते आणि पुन्हा पैशाची मागणी करत होता, अशी फिर्याद ओंकारचे वडील बन्सीधर गायकवाड यांनी परभणी ग्रामीण ठाण्यात दिली. याप्रकरणी मध्यरात्री पप्पू वैद्य व अन्य तिघांवर भा.न्या.सं. कलम १४०(३), ३५१(२), ३ (५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासाची दिशा
ट्रॅक्टरच्या पैशाच्या आर्थिक वादातून घटना घडल्याचे प्रथमदर्शनी वाटत असले तरी अविवाहित मृत युवकाच्या उजव्या मनगटावर 'रूपाली' हे नाव इंग्रजीत गोंदवलेले आढळले. त्यामुळे प्रेमसंबंध संशयाच्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. नदीम अन्सारी यांनी शवविच्छेदन केले. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

आरोपींच्या शोधासाठी तीन पथके
सद्य:स्थितीत सेलू ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असली तरी, पुढील तपास परभणी ग्रामीण ठाण्यात सुरू आहे. दाखल गुन्ह्यात खुनाचा गुन्हा वाढवला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, सेलू, परभणी व स्थानिक गुन्हे शाखेची अशी ३ पथके आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे.

 

Web Title: 'Rupali' tattoo on the deceased's Onkar Gaikwad hand, was the kidnapping and murder in Parbhani a financial dispute or a love affair?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.