परभणी मनपा सभा २० मिनिटांत गुंडाळली; भाजप-राष्ट्रवादी सदस्यांचा आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:09 IST2026-04-09T16:09:07+5:302026-04-09T16:09:23+5:30
"व्हिडिओ दाखवा, मगच बाहेर पडू"; सभा संपवल्याच्या मुद्द्यावरून परभणी मनपा आयुक्तांच्या केबिनमध्ये सदस्यांची आक्रमक भूमिका.

परभणी मनपा सभा २० मिनिटांत गुंडाळली; भाजप-राष्ट्रवादी सदस्यांचा आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिय्या
- राजन मंगरूळकर
परभणी : महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी २.३० वाजता आयोजित केली होती. ही सभा २० ते २२ मिनिटात दोन विषयांच्या प्रक्रियेतच पूर्ण झाली. सभा समतीच्या प्रक्रियेपूर्वी दाखल झालेल्या भाजप, राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडी असे काही सदस्य सभागृहात दाखल झाले. मात्र, सभा संपून आयुक्त आणि महापौर, उप महापौर हे बाहेर पडले. त्यामुळे सभेत शहर विकासाचे प्रश्न व अन्य बाबी यावर चर्चा न करताच सभा संपलेल्याचा आरोप करीत जवळपास २८ सदस्यांनी बी. रघुनाथ सभागृह येथून आयुक्तांची केबिन गाठून केबिनमध्ये ठिय्या मांडला.
मनपाची तिसरी विशेष सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी बी. रघुनाथ सभागृहात आयोजित केली होती. या सभेमध्ये एकूण २ विषय ठेवले होते. स्थायी समिती सदस्यांची निवड व विविध समित्या वरील समिती सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. सुमारे २० मिनिट झालेल्या या बैठकीत इतर प्रश्नावर चर्चा झाली नाही. दोन्ही विषयांची प्रक्रिया पूर्ण होतात भाजप राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीचे काही सदस्य सभाग्रहमध्ये दाखल झाले. परंतु थेट राष्ट्रगीत सुरू झाले आणि उर्वरित शहर विकासाच्या प्रश्नावर कुठलीही चर्चा न करता सभा संपविल्याचा आरोप करीत या सदस्यानी बी. रघुनाथ सभागृह सोडून मनपा आयुक्त यांचे केबिन गाठले. सुमारे २० मिनिटपासून हा ठिय्या सुरू आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे गटनेते विजय जामकर, भाजपा गटनेता तिरुमला खिल्लारे, शहर विकास आघाडीचे गटनेते सागर गांगाळे यांच्यासह महिला आणि तिन्ही पक्षातील जवळपास २८ सदस्य सहभागी झाली आहेत.
व्हिडिओ दाखवा मगच बाहेर जाऊ
आम्ही सभेच्या सभागृहामध्ये उशिराने आलो नाही, तरी सभा थेट संपवण्यात आली. विरोधी पक्षाच्या सदस्यांना विचारात न घेता सभा संपली. यामुळे आता आम्ही उशिरा आलो की आधी आलो याचा सभेतील पुराव्याचा व्हिडिओ दाखवा मगच आम्ही केबिनमधून बाहेर पडू, अशी भूमिका सर्व सदस्यांनी घेतली आहे.
शहराचे प्रश्न बाजूलाच
सभागृहातून थेट आयुक्तांच्या केबिनमध्ये आलेल्या सर्व सदस्यांनी आयुक्तांना शहरी विकासाच्या प्रश्नावर धारेवर धरले. विविध प्रकारची बिले दिली जात आहेत प्रत्यक्षात कामे कुठे आहेत, नागरिक आम्हाला जाब विचारत आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभा लावून त्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न चर्चेला येणे अपेक्षित आहे , अशी भूमिका सदस्यांनी घेतली. शहराचे प्रश्न बाजूलाच ठेवून सभा संपविण्याचा घाट घातल्याचे सदस्यांनी व्यक्त केले.