परभणी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात डिसेंबरमध्ये झालेल्या अवमान घटनेनंतर झालेले आंदोलन या संपूर्ण बाबींची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे. या समितीचे प्रमुख सेवानिवृत्त न्यायमूर्ती विजय आचलिया यांनी मंगळवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराची मंगळवारी दूपारी पाहणी केली. याशिवाय त्यांनी मुख्य बाजारपेठ आणि नवा मोंढा पोलीस ठाण्यातही भेट दिली.
राज्य सरकारच्या वतीने नेमलेल्या चौकशी समितीचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त न्यायमूर्ती विजय आचलिया हे परभणी शहरात मंगळवारी दाखल झाले. चौकशी आणि इतर बाबींची माहिती घेण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. त्यानंतर मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात भेट देऊन पाहणी केली. त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पांडुरंग गवते, वामन बेले, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी निवृत्त न्यायाधीश विजय आचलिया यांना अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनाक्रम आणि परिसरातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनाची माहिती दिली.
स्टेशन रोड भागाला दिली भेटभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते स्टेशन रोडकडे जाणाऱ्या मार्गावर त्यांनी विसावा कॉर्नर येथे भेट देऊन विविध ठिकाणी दुकानाचे झालेले नुकसान आणि इतर घटनेच्या अनुषंगाने माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा नवा मोंढा पोलीस ठाण्यात दाखल झाला. तेथे नवा मोंढा पोलीस ठाण्यात सुरक्षा व्यवस्था आणि लॉकअप यासह विविध बाबींचा त्यांनी आढावा घेतला. सर्व आढावा घेऊन ते परत शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले.