दीड महिना उलटूनही नुकसानग्रस्त घरांचा अहवाल सादर होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST2020-12-12T04:33:51+5:302020-12-12T04:33:51+5:30
जिंतूर: सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदारांनी पंचायत समितीच्या अभियंत्यांना आदेश दिले होते. मात्र ...

दीड महिना उलटूनही नुकसानग्रस्त घरांचा अहवाल सादर होईना
जिंतूर: सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदारांनी पंचायत समितीच्या अभियंत्यांना आदेश दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे अभियंत्यांकडून होत नसल्याने तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येत आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील १९ ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले. या ग्रामस्थांनी घरांचे पंचनामे करुन मदत द्यावी, यासाठी तहसील कार्यालयाकडे दीड महिन्यापूर्वी निवेदने, अर्ज व तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करुन अहवाल सादर कऱण्याच्या सूचना पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला २६ ऑक्टोबर रोजी दिल्या होत्या.त्यानंतर एक महिना अहवालाची वाट पाहून २३ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा या अभियंत्याला लेखी पत्र देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले; परंतु, या पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंत्याने तहसीलदारांचे दोन्ही आदेश मिळाल्यापासून दीड महिना उलटला तरीही १९ पैकी एकाही नुकसानग्रस्त घराचा पंचनामा केला नाही. तहसीलदारांना अहवालही सादर केला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांबरोबरच अधिकाऱ्यांनाही कामचुकार कर्मचाऱ्यांचा फटका बसत असल्याचे या प्रकरणावरुन समोर येत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याविरुद्ध जिंतूर तहसीलदारांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे जिंतूरवासीयांचे लक्ष लागले आहे.
या गावातील घरांचे नुकसान
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिंतूर तालुक्यातील ४, बोरी १. घागरा २, चारठाणा १, सोरजा १, मोहाडी १, वर्णा ८ तर रेपा येथील शेख कासम बाबामियाँ या ग्रामस्थाचे अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले होते. या घटनांमध्ये घरांचे नुकसान होऊन संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान होऊनही घरांचे पंचनामे न झाल्यामुळे या ग्रामस्थांना उघड्यावरच आसरा घ्यावा लागत आहे.
संबंधित अभियंत्याला दोन वेळा लेखी पत्र देऊन विहित कालावधीत माहिती अहवाल मागविला आहे. मात्र हा अहवाल न आल्यामुळे शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
-सखाराम मांडवगडे, तहसीलदार, जिंतूर