रस्ता दुरुस्त करा, आमचा जीव वाचवा! जिंतूर-येलदरी रस्ता दुरुस्तीसाठी लक्षवेधी तिरडी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:43 IST2025-05-28T16:43:05+5:302025-05-28T16:43:30+5:30

रस्त्याच्या खस्ताहाल अवस्थेविरोधात नागरिकांचा अनोखा एल्गार

Repair the road, save our lives! Eye-catching Tiradi protest for repair of Jintur-Yeldari road | रस्ता दुरुस्त करा, आमचा जीव वाचवा! जिंतूर-येलदरी रस्ता दुरुस्तीसाठी लक्षवेधी तिरडी आंदोलन

रस्ता दुरुस्त करा, आमचा जीव वाचवा! जिंतूर-येलदरी रस्ता दुरुस्तीसाठी लक्षवेधी तिरडी आंदोलन

येलदरी वसाहत (जि. परभणी) : जिंतूर–येलदरी मुख्य रस्त्याच्या दयनीय स्थितीविरोधात संतप्त नागरिकांनी २८ मे रोजी तिरडी यात्रा काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला. हे आंदोलन अनोख्या पद्धतीने करण्यात आले असून, यात तृतीयपंथीयांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

हा रस्ता केवळ जिंतूर तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा मार्ग नाही, तर तो मराठवाडा आणि विदर्भ यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की “रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अपघाताचा धोका वाढत असून, पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शाळकरी मुले, रुग्ण, शेतकरी आणि वाहनधारक यांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ "रस्ता दुरुस्त करा आमचा जीव वाचवा" असे फलक घेऊन नागरिकांनी तिरडी यात्रा काढली. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा प्रतिकात्मक उपाय योजण्यात आला.

याआधीही खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन झाले होते आणि त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात काही कामे करण्यात आली. मात्र, पहिल्याच पावसात मुरुम वाहून गेल्याने पुन्हा मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे.

या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, काँग्रेस, रिपब्लिकन सेना यांसारख्या संघटनांचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागरिकांनी इशारा दिला आहे की प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास पुढील टप्प्यात तीव्र ठिय्या आंदोलन छेडले जाईल.

Web Title: Repair the road, save our lives! Eye-catching Tiradi protest for repair of Jintur-Yeldari road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.