ऑक्सिजनअभावी रुग्णाच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेचे वाभाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST2021-04-04T04:17:52+5:302021-04-04T04:17:52+5:30
परभणी : येथील जिल्हा रुग्णालयाच्या सारी कक्षात ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने जिल्हा रुग्णालय ...

ऑक्सिजनअभावी रुग्णाच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेचे वाभाडे
परभणी : येथील जिल्हा रुग्णालयाच्या सारी कक्षात ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या संपूर्ण घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसभर बैठक घेऊन जिल्हा शल्य चिकित्सकांसह संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र, घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत ठोस भूमिका न घेताच बैठक आवरती घेण्यात आली.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सारी वॉर्डात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा शनिवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. यावेळी वॉर्डात एकही तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नव्हता. रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता होती आणि ते वेळेत मिळाले नसल्यानेच रुग्ण दगावल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी पहाटे ४ वाजल्यापासून रुग्णालय परिसरात गोंधळ घातला. नातेवाईकांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या मृत्यूचे कारण विचारले? मात्र, कर्मचाऱ्यांना याविषयी स्पष्ट काही सांगता आले नाही. नातेवाईकांच्या प्रश्नांचा भडिमार होत असल्याने काही वेळात कर्मचारीही गायब झाले. रुग्णालयात गोंधळ वाढत असल्याने नानलपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी संबंधितांकडे दाद मागितली. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद रुग्णालय प्रशासनाकडून मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू होत असेल तर ही बाब गंभीर असून, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांची कानउघडणी
या सर्व प्रकारानंतर जिल्हा रुग्णालय परिसरात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी खासदार बंडू जाधव यांच्यासह पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुळीक, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, डाॅ. प्रकाश डाके, तहसीलदार संजय बिरादार आदींची उपस्थिती होती. सारी वॉर्डात इतर रुग्णांबरोबरच जिल्हा रुग्णालयातील १५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावरही उपचार करण्यास कोणीही पुढे आले नसल्याची बाब यावेळी समोर आले. या प्रकारामुळे खासदार बंडू जाधव संतप्त झाले. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची चांगलीच कानउघडणी केली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.
दोषींवर कारवाईसाठी आणखी एक वांझोटी समिती
जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत अनेक वेळा गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रत्येक वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नियुक्त केली. आतापर्यंत पाच ते सहा समित्यांची स्थापना झाली. मात्र, एकाही समितीचा अहवाल प्राप्त होऊन दोषींवर कारवाई झाली नाही. त्यामुळे या समित्या केवळ वेळ मारून नेण्यासाठीच आहेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. आजच्या प्रकारणातही अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे ही समिती रुग्णांच्या नातेवाईकांना कितपत न्याय देईल आणि समितीमुळे रुग्णालयाचा कारभार सुधारेल का? या विषयी शंकाच उपस्थित होत आहे.