कारागृहातून बाहेर आला, पोलिसांनी त्वरित हद्दपार केला; शेख सुलेमान ऊर्फ बादल शेख सिद्दीकवर दहा गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 21:21 IST2025-11-09T21:20:30+5:302025-11-09T21:21:13+5:30
या आरोपीविरुद्ध कारागृहातून बाहेर येताच हद्दपार आदेशाप्रमाणे जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई केली.

कारागृहातून बाहेर आला, पोलिसांनी त्वरित हद्दपार केला; शेख सुलेमान ऊर्फ बादल शेख सिद्दीकवर दहा गुन्हे
राजन मंगरूळकर
परभणी : विविध प्रकारचे १० गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर पोलिस यंत्रणेने उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे नमूद इसमास एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार या आरोपीविरुद्ध कारागृहातून बाहेर येताच हद्दपार आदेशाप्रमाणे जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई केली.
शेख सुलेमान ऊर्फ बादल शेख सिद्दीक (२४, रा. काद्राबाद प्लॉट) या इसमाविरुद्ध नानलपेठ ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी गंभीर दुखापत पोहोचविणे, जबरी चोरी करताना दुखापत करणे, लोकसेवकावर हमला करून जबर दुखापत करणे, असे विविध दहा गुन्हे दाखल होते.
याबाबत पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या आदेशाने नमूद गुन्हेगाराविरुद्ध पोलिस निरीक्षक गणेश कदम, सहायक पोलिस निरीक्षक मारुती कारवार यांनी हद्दपार प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी शहर यांनी चौकशी करून पाठविला. यानंतर १९ सप्टेंबरला उपविभागीय दंडाधिकारी उदयसिंह भोसले यांनी नमूद गुन्हेगारी इसमास पुढील एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले. नमूद आरोपी हा कारागृह परभणी येथून आठ नोव्हेंबरला जामिनावर बाहेर येताच त्याच्याविरुद्ध लागलीच जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई आदेशाने करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गणेश कदम, सपोनि कारवार, उपनिरीक्षक बिक्कड, सोडगीर, इर्षाद अली, चव्हाण, पोले, गोला, मुरकुटे यांनी केली.